डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकते जिने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत; मात्र स्थानकातील सरकते जिने बंद असल्याने उन्हातून थकलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातील जिने चढून जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून रहिवाशांची संख्या वाढली आहे. डोंबिवली स्थानकात होणारी गर्दी पाहता डोंबिवली, कल्याण पूर्व व ठाकुर्लीतील नागरिक ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. या ठिकाणी पूर्वेला प्रवाशांच्या सोयीसाठी सरकत्या जिन्याची सोय केली आहे; मात्र हे सरकते जिने अनेकदा बंद असल्याचे दिसून येते.
उन्हातून चालून आल्यानंतर अनेकदा जिने चढताना काहींना दम लागतो, श्वास फुलतो तसेच जिने चढून जाण्याची ताकद राहत नसल्याने प्रवासी सरकत्या जिन्याचा वापर करतात; मात्र रेल्वे स्थानकात पाऊल टाकताच हे बंद सरकते जिने त्यांची निराशा करतात. यामुळे नागरिक त्रस्त असून दुरुस्तीच्या नावाखाली अनेक दिवस हे जिने बंद ठेवले जातात असा आरोप प्रवाशी करतात. तसेच स्थानकातील सरकते जिने तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
