अशोक गायकवाड
नवी मुंबई : ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. महालक्ष्मी सरस २०२४ प्रदर्शन व विक्रीचे भव्य उद्घाटन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई याठिकाणी भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात ‘घे भरारी – मला पंख मिळाले’ या कार्यक्रमात सहभागी उमेद अभियानाच्या महिलांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उमेद अभियानचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी, श्रीमती मंजिरी टकले तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना चालना मिळावी, त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा आधार मिळावा, यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण महिलांना पाठिंबा द्यावा. असे अवाहान ही जयवंशी यांनी केले.या प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये हातमाग, कलाकुसर, हस्तकला, साड्या, कपडे, मसाले, सजावटीच्या वस्तू, तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचा समावेश आहे.तसेच, महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी ७० भव्य स्टॉल्सचे फूड कोर्ट उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी आपल्या कौशल्याने साकारलेल्या उत्पादनांचा विशेष ठसा उमटवला आहे. नवी मुंबईतील नागरिकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. महालक्ष्मी सरस २०२४ हे प्रदर्शन फक्त विक्रीसाठी नाही तर ग्रामीण संस्कृतीचा आणि कलेचा अनुभव घेण्यासाठी एक पर्वणी आहे. संपूर्ण वातानुकूलित व्यवस्थेमुळे खरेदीसाठी अतिशय सुखद वातावरण आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील महिलांनी आपल्या उत्पादनांसह सहभाग घेतला आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि ग्रामीण महिलांच्या यशाला प्रोत्साहन द्यावे.