नवी दिल्ली : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात विरोधात शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरात जोरदार आवाज उठविला. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र शासनाकडे केली.
आपल्या शेजारी देश असलेल्या बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. हा मुद्दा केवळ बांगलादेशचा अंतर्गत विषय नसून मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. बांगलादेशात अलीकडेच खून, विनयभंग आणि अपहरण या सारख्या अमानुष घटनांसह २०१०घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमुळे तब्बल १७०५ कुटुंबे बाधित झाली आहेत. विशेष म्हणजे चिन्मय कृष्ण दास यांच्यासारख्या आदरणीय धर्मगुरूंच्या अटकेमुळे परिस्थिती अधिकच चिघळल्याचे सांगत खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेचे लक्ष वेधले. बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या अत्याचाराच्या घटनांमुळे केवळ हिंदूच नव्हे, तर बौद्ध आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदायही संकटात सापडला आहे. ढाका, चटगांव आणि रामपूर मध्येही शांततापूर्ण निदर्शने आता हिंसक झाली असून अनेक जण जखमी झाले आहेत. नुकतेच झालेले हल्ले आणि दोन कोटींहून अधिक धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत वाढती चिंता ही मानवी हक्कांच्या उल्लंघनाची स्पष्ट उदाहरणे असल्याचे खासदार नरेश म्हस्के सांगितले. अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी बांगलादेश सरकारने करावी यासाठी केंद्र सरकारने कडक शब्दांत मध्यस्थी करावी, अशी माझी केंद्राला विनंती असल्याचे खासदार नरेश म्हस्के सांगितले. भारत सरकारने आपले राजनैतिक प्रयत्न अधिक तीव्र करावेत आणि बांगलादेश बरोबरच्या द्विपक्षीय चर्चेत अल्पसंख्याकांच्या संरक्षणाच्या मुद्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.