शाश्वत भविष्याकरिता माहिती व ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी
नवी मुंबई : नॅशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देत महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती जाणून घेतली आणि भारतातील एका आधुनिक शहराला भेट दिल्याचा आनंद व्यक्त केला.
रिलायन्स फाऊंडेशन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेव्दारा संचालित जिओ इन्स्टिट्युटच्या समन्वयातून सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीच्या 10 विद्यार्थ्यांनी त्यांच्या भारत देशाच्या अभ्यासभेटीत नवी मुंबई शहरास भेट दिली. या दरम्यान त्यांनी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याशी संवाद साधत इतर शहरांपेक्षा नवी मुंबईच्या असलेल्या वेगळेपणाविषयी भाष्य केले. आयुक्तांनी विद्यार्थी व त्यांचे प्राध्यापक यांच्याशी चर्चा करीत नवी मुंबई शहराचे वेगळेपण तसेच याठिकाणी सुरू असलेले प्रकल्प व पर्यावरणशील उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली.
भारतातील बाजारपेठ व गुंतवणूक याविषयीचा अभ्यास करण्यासाठी आलेला हा सिंगापूर देशातील अभ्याससमुह भारत देशात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा वेग आणि त्याचा परिणाम याविषयी माहिती संकलित करीत आहे. तसेच विकास प्रक्रियेत शाश्वत पध्दतींचा वापर करण्याची पर्यावरणपूरक भूमिका याविषयी अभ्यास करीत आहे.
या अनुषंगाने भारतातील कार्यक्षम महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन तसेच पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन या स्वच्छतेशी निगडीत बाबींची माहिती घेण्यासाठी या विद्यार्थी समुहाने नवी मुंबईस भेट दिली. यामध्ये त्यांनी पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन, कांदळवनांची जपणूक, मियावाकी शहरी जंगल व इतर पर्यावरणपूरक उपक्रम व कामे, हवा गुणवत्ता, सौरऊर्जा आणि पदपथांवरील दिव्यांच्या व्यवस्थापनातून वीजबचतीवर दिला जाणारा भर, पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा उद्यानांसाठी होणारा वापर अशा विविध विषयांवर सविस्तर माहिती जाणून घेतली.
महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांनी या अभ्यासभेटीच्या समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहिले. सिंगापूर व्यवस्थापन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबतच या अभ्यासदौ-यात विद्यापीठाचे मार्केंटींग विभागप्रमुख डॉ. सेशन रामास्वामी, स्टुडन्ट्स अफेअर्सच्या विभागप्रमुख प्रा. सुरिंदर कौर व व्यवस्थापक प्रा. अविनाश झा आणि जिओ इन्स्टिट्युटचे सुरक्षा विभाग मार्गदर्शक श्री.जयेंद्र भोसले उपस्थित होते.
00000