माथेरान : नेहमीच्या शाळेच्या अभ्यास क्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर स्कुल, नगरपालिका प्राथमिक शाळा सेंट झेव्हीयर स्कुल आणि अंगणवाडी शाळेतील मुलांना घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येत असते.याच व्यासपीठावर सर्वांना आपल्या कला सादर करण्याची संधी प्राप्त होत असते.परंतु यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा मोठया प्रमाणावर आपला सहभाग नोंदवल्याने न भूतो न भविष्यती असे स्नेहसंमेलन यावेळी प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले. सर्वांच्या अंगी असलेले सुप्त गुण यानिमित्ताने पहावयास मिळाले. एकांकिका, नृत्य, गाणी, कोळी नृत्य, कोकणी नाटक,कपल डान्स,लावणी असे विविध प्रकारचे कलाविष्कारांचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.गायक पूजा केतकर, चंद्रकांत काळे, वसंत कदम, सुनील कदम, तबसुम शेख, स्मिता गायकवाड यांनी गायलेल्या अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तर शिक्षक संघपाल वाठोरे यांच्या स्वरचित कविताना प्रेक्षकांनी उत्तम प्रकारे दाद दिली. सलग दोन दिवस या स्नेहसंमेलनाचे आयोजन नगरपरिषदेच्या माध्यमातून उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी केले होते. तर नगरपालिका कार्यालय अधीक्षक सदानंद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही शाळांचे शिक्षक यांच्या अथक प्रयत्नांतून स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि यास प्रेक्षकांनी सुध्दा या गुलाबी थंडीत सुध्दा भरभरून प्रतिसाद दिला. वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दि.१४/१५ रोजी गव्हाणकर शाळेचे विश्वस्त दादासाहेब गव्हाणकर आणि काही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला.या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थीनी रिझवाना शेख, मंगेश मोरे यांनी केले.
गव्हाणकर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, शिक्षक संघपाल वाठोरे, विदुला गोसावी, दिनकर चव्हाण,नगरपालिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे, लक्ष्मण जानू ढेबे, सचिन भोईर, संतोष चाटसे, अमोल अंधारे , साक्षी कदम, मनिषा चौधरी , किरण शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ज्योती शिंदे, त्याचप्रमाणे सेंट झेव्हीयर शाळेच्या शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.