‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’ – छगन भुजबळ
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक- तानाजी सावंत
आज प्रमोद महाजनांची आठवण येते- सुधीर मुनगंटीवार
मुंबई : महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर महायुतीत आनंदाची लाट उसळायच्याएवेजी नाराजीची लाट उसळली आहे. राज न मिळाल्यामुळे ना’राज’ झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तर ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’ असे नागपुर विधानसभा अधिवेशानात ठणकावून पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तानाजी सावंतांनी आपल्या फेसबुकवरून धनुष्यबाण हटवित बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक असल्याचा गर्भित इशारा पक्षीय नेतृत्वाला दिला आहे. तर राष्ट्रयी स्वयंसेवक संघाच्या शिस्तीत वाढलेल्या संजय कुटेनी आजच्या राजनितीवर मर्मभेदी प्रहार करीत ही असली कुटनीती मला कधी जमली नाही अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे. एकुणच महायुतीतील ही नाराजी लवकरच रोखली नाही तर या नाराजीची त्सुनामी येण्यास वेळ लागणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यानंतर त्यांची आपल्याच पक्षातील नेत्यांबाबतची नाराजी लपून राहिलेली नाही. दरम्यान राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्याची ऑफर छगन भुजबळांनी फेटाळून लावली आहे.
“मला मंत्रिपद दिलं नाही म्हणून मी नाराज नाही. अनेकवेळा अशी मंत्रिपदे आली आणि गेली. मी विरोधीपक्ष नेता म्हणून दखील काम केलेलं आहे. शिवसेनेचा एकटा आमदार असतानाही मी सर्वांना तोंड देण्याचं काम केलं. प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही. ज्या पद्धतीने ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं. त्यामुळे मी दु:खी आहे. मंत्रिपदे येतात आणि जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना शरद पवार यांच्याबरोबरही मी होतो. तसेच अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबरही मी होतो”, असं छगन भुजबळांनी म्हटलं.
अजित पवारांच्या प्रतिमेला मारले जोडे
मात्र, असे असताना शपथविधीमध्ये मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने जुने व वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. त्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बड्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी न दिल्याने आता उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ही नाराजी बोलून देखील दाखवली. परिणामी त्याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटायला सुरुवात झाली असल्याचे बघायला मिळाले आहे. मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावल्याचा निषेध व्यक्त करत जालन्यात भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी शहरातील गांधी चमन येथे जोडे मारो आंदोलन केलंय. यावेळी या आंदोलकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. दरम्यान मंत्रिमंडळात समावेश न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी आंदोलकांनी दिलाय.
उद्यापासून छगन भुजबळ समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना भेटणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरविणार आहेत.
आज प्रमोद महाजन यांची आठवण येते आहे..- सुधीर मुनगंटीवार
मला मंत्रिमंडळात ज्यांनी घेतलं नाही तेच उत्तर देऊ शकतील की मला मंत्री का केलं नाही. मला काही सांगता येणार नाही. अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मला मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाही अशी जाणीव मला कुणी करुन दिली नाही. मी संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला प्रमोद महाजन यांचं वाक्य आठवतं आहे पावला-पावलावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम पुढे नेतो तोच खरा कार्यकर्ता. हे वाक्य मी माझ्या मनात जपून ठेवलं आहे. असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. माझं देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलणं व्हायचं पण मी मंत्रिमंडळात नाही हे काही मला जाणवलं नाही. माझं नाव मंत्रिमंडळात आहे हे सांगण्यात आलं होतं असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मला दोन्ही नेत्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही नाव आहे हेच सांगितलं होतं”, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
तानाजी सावंत यांनी डीपी बदलला
शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्रीपद न मिळाल्यामुळे नागपुरमधून तडकाफडकी पुण्याला निघून आले होते. आज तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचा कव्हर फोटो आणि डीपी दोन्ही बदललं आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह असलेलं प्रोफाइल सावंत यांनी हटवलं आहे. त्याऐवजी, नवीन प्रोफाईल ठेवण्यात आलं असून या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये फक्त शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून येत आहे. तसेच, शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक उल्लेख असलेला बाळासाहेबांचा फोटो असल्याचं पाहण्यास मिळतं आहे. तानाजी सावंत यांनी फेसबुकचा डीपी आणि कव्हर फोटो दोन्ही बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्राचा बिहार झाला, आता मंत्रिपद
मिळालं तरी घेणार नाही – शिवतारे
“महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण इथं प्रादेशिक समतोल न राखता जातीय समतोल राखण्यासाठी प्राधान्य दिल्याचं दिसत आहे,” असा हल्लाबोल विजय शिवतारे यांनी केला. तसंच पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की, “मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं जास्त वाईट वाटत नाही. मात्र महायुतीतील तीनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती चुकीची आहे. हे नेते साधे भेटायलाही तयार नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. “आता अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी मी ते घेणार नाही. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही,” असं म्हणत शिवतारे यांनी आपल्या आक्रमक भावना व्यक्त केल्या.