नोव्हेंबरमध्ये ९४१ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न

मुंबई : एरव्ही तोट्यात असणाऱ्या एसटीला एन दिवाळीत विक्रमी ९४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एसीटची दिवाळी जोरात असल्याची चर्चा आगारात रंगली होती. सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल  ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न  नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त  आहे.  विशेष म्हणजे मागील वर्षी दिवाळीच्या काळात १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा ही भाडेवाढ नसतांना देखील वाढलेले विक्रमी उत्पन्न हे एसटीवर सर्वसामान्य प्रवाशांनी दाखवलेले विश्वासाचे द्योतक आहे, असे प्रतिपादन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक *डॉ. माधव कुसेकर* यांनी केले आहे.

    एसटीचे प्रवासी उत्पन्न जरी वाढलेले असले तरी, त्याप्रमाणामध्ये एसटीचा खर्च देखील वाढलेला आहे.  इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर व सुट्ट्या  भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा प्रतिकूल परिणाम एसटीचा खर्च वाढीवर झालेला आहे. त्यामुळे संचित तोटा 11 हजार कोटी पर्यंत पोहोचला आहे. तसेच या नोव्हेंबर महिन्यात नियमित खर्चा बरोबरच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे 52 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा एसटीच्या तिजोरीवर पडला आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. या सर्वांचा विचार करुन नाईलाजास्तव उत्पन्न आणि खर्चातील ताळमेळ राखण्यासाठी एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *