पंढरपूर: माढा मतदारसंघात शरद पवारांनी विजयसिंह मोहीते पाटील यांना राष्ट्रवादीत दाखल करून घेतल्यामुळे मतदार संघाचे बिघडलेले गणित सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
मोहिते-पाटलांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल सुरु केले आहे. मोहिते-पाटील यांच्यासोबत उत्तमराव जानकर हेदेखील तुतारी हाती धरतील असे सांगितले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतले आहे.
उत्तम जानकर यांना सागर बंगल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे विशेष विमान बारामती विमानतळावर पाठवण्यात येणार आहे. या विमानाने उत्तम जानकर हे मुंबईत उतरतील आणि देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचतील. याठिकाणी प्राथमिक चर्चा करुन देवेंद्र फडणवीस उत्तर जानकर यांना थेट दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
