१०० ते १००० रुपये भुर्दंड, प्रशासकांसमोर सादरीकरण झाले

 

मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारती, हॉटेल आणि कमर्शियल कारखान्यांतून निघणाऱ्या कचऱ्यांवर आता मुंबई महापालिका निर्मूलन कर आकारण्याच्या विचारात असून, सोमवारी झालेल्या सादरीकरणानुसार ही करवाढ लादली गेलीच तर केवळ निवासी घरांना तब्बल ६८७ कोटी रुपयांचा कचरा कर भरावा लागू शकतो.
महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांच्यासमोर सोमवारी सकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा कर लागू करण्यासोबतच उघड्यावर धुंकणे, उघड्यावर कचरा करण्यावरील दंड वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला. सध्या धुंकण्यावर फक्त २०० रुपये दंड आहे. तो ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव सादरीकरणात ठेवला गेला. मात्र, सर्वांत मोठा विषय आहे तो कचरा कर लावण्याचा आणि त्यासाठी महापालिकेचे उपविधी अर्थात बायलॉज बदलावे लागणार आहेत. या बदलासाठीची कायदेशीर बाबी तपासण्याचे निर्देश गगराणी यांनी दिल्याचे कळते. मुंबई महापालिकेकडून ५०० फुटांपर्यंतच्या घरांना किमान १०० रुपये, तर त्यापेक्षा मोठ्या घरांना ५०० ते १००० रुपये कचरा निर्मूलन शुल्क आकारण्यात येणार आहे. व्यापारी गाळे आणि व्यापारी संकुलांवर हेच कचरा शुल्क किती आकारायचे हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, निवासी भागापेक्षा ते नक्कीच जास्त असेल. अर्थात असे कोणतेही शुल्क लादताना मुंबईकरांच्या सूचना, हकरती विचारात घ्याव्या लागतील, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. यापूर्वी २०१९- २० मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि त्यानंतर २०२०- २१ मध्ये प्रवीणसिंह परदेशी यांनी प्रत्येक सोसायटीला कचरा शुल्क आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र तत्कालीन नगर सेवकांनी विरोध केल्याने सदर योजनेला स्थगिती मिळाली होती. आता प्रशासकीय राजवटीत या प्रस्तावाने पुन्हा उचल खाल्ली आहे.
अधिकारी सूत्रांनी पुढारीला सांगितले की, मुंबई महापालिका कायद्यानुसार, घनकचरा व्यवस्थापनाच्या सेवा मोफत देणे महानगरपालिकेला बंधनकारक आहे. म्हणूनच या सेवेवर कोणतेही शुल्क आतापर्यंत आकारता आलेले नाही. ते लादायचे असेल तर कायद्यात बदल करावा लागेल. सध्या पुणे, चेन्नई आणि दिल्लीत घनकचरा उचलण्यासाठी निवासी गाळ्यांना सरसकट १०० रुपये, तर व्यापारी गाळ्यांसाठी ५०० रुपये कचरा शुल्क आकारले जाते. ही ढाल आता मुंबईतही पुढे केली जात आहे. अर्थात माजी मंत्री आदित्य ठाकरे, खा. वर्षा गायकवाड, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख आदी नेत्यांनी या हालचालींना विरोध चालवला असून, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कचरा शुल्क आकारणी रोखली जाण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते रवी राजा यांनीही या हालचालींना विरोध केला आहे. मुंबईकरांकडून महापालिका कचरा शुल्क आकारणार असल्याचे समजले असून लवकरच दोन-तीन दिवसांत मी आणि भाजपा नेते महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन विरोध दर्शविणार आहोत, असे रवी राजा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *