डोंबिवली : भारताचे पारपत्र (पासपोर्ट) आणि व्हिसाविना गेल्या आठ वर्षांपासून कल्याण पूर्वेकडे असलेल्या विठ्ठलवाडीतील जुनी सोनिया कॉलनीत वास्तव्य करणाऱ्या दोघा बांग्लादेशी घुसखोर दाम्पत्याला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सोमवारी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोळसेवाडी पोलिसांनी पती-पत्नी असलेल्या या दोन्ही बांग्लादेशी नागरिकांचा ताबा घेतला आहे.
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडीमधील जुनी सोनिया चाळ क्र. 7 मधील 5 क्रमांकाच्या खोलीमध्ये दोन बांग्लादेशी राहत असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रँचच्या उल्हासनगर युनिटला मिळाली होती. त्यानुसार या युनिटने मिळालेल्या माहितीची खात्री केली. क्राईम ब्रँचने हे रहिवासी राहत असलेल्या खोलीवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. हे दोघे नात्याने पती-पत्नी असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले.
कमल हसन मो. हरजत अली (44, मूळ रा. ग्राम – रामपूर माटीपुकूर, उपजिल्हा – शारशा, जिल्हा – जेस्सोर, विभाग – खुलना, बांग्लादेश) आणि त्याची पत्नी अंजुरा कमल हसन (37, मूळ रा. ग्राम – बागाचौरा, बेनापोल स्ट्रीट, उपजिल्हा – शारशा, जिल्हा – जेस्सोर, विभाग – खुलना, बांग्लादेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दाम्पत्य या भागात मागील आठ वर्षांपासून राहत आहेत. यातील कमल हा एका वाहनावर चालक म्हणून नोकरी करतो, तर त्याची पत्नी अंजुरा ही एका हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम करते. हे दाम्पत्य मुळचे बांग्लादेशातल्या जेस्सोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
हे दोन्ही बांग्लादेशी रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात घुसून पारपत्र आणि व्हिसाविना चोरी-छुपे राहून व्यवसाय करत असल्याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात उल्हासनगर क्राईम ब्रँचचे रामदास उगले यांच्या तक्रारीवरून पारपत्र कायदा आणि विदेशी व्यक्ति अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जी. एम. न्हायदे अधिक तपास करत आहेत.
00000