नागरिकांचे हाल

 

ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे ५५० कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी अघोषित संपावर गेले आहेत. ठेकेदारामार्फत वाढीव वेतन मिळालेले नाही. त्यामुळे हा संप पुकारल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपामुळे बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडी त्यातच, टिएमटी चालकांचा संप या दोन्ही प्रकारामुळे नागरिकांचे हाल झाले.
ठाणे महापालिका क्षेत्रात टिएमटीच्या माध्यमातून महापालिका सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते. टिएमटीच्या ताफ्यात ४७४ बसगाड्या असल्या तरी यातील सुमारे ५० बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाही. यातील २२५ बसगाड्या खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. या बसगाड्या घोडबंदर येथील आनंद नगर आगारातून सुटतात. ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत टिएमटी बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते.
मंगळवारी सकाळी टिएमटीचे चालक अघोषित संपावर गेले. ठेकेदारने नियमानुसार वेतन वाढविले नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. टिएमटीच्या बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यातच मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने टिएमटीच्या इतर बसगाड्या प्रवाशांना वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. प्रशासनाकडून हा संप मिटविण्याबाबत मार्ग काढला जात असल्याची माहिती टिएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाने वाढीव वेतनाबाबत लिखित द्यावे. त्यानंतर लगेचच संप मागे घेतला जाईल असे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *