संबंधित अधिकाऱ्यांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करा-डॉ. उदय नारकर
अनिल ठाणेकर
ठाणे : परभणी येथे बंदच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अतिरेकी रानटी कारवाईत अनेक निरपराध नागरिकांवर जाणूनबुजून अत्याचार करण्यात आले. सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा कोठडीत पोलिसांनी केलेल्या निर्घृण मारहाणीत मृत्यू झाला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, मृताच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करा आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कायम शासकीय सेवेत सामावून घ्या अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य कमिटीचे सचिव डाॅ उदय नारकर यांनी केली आहे.
त्याचबरोबर कोम्बिंग ऑपरेशनच्या नावे दलित वस्त्यांमध्ये घुसून महिलांसकट निरपराध नागरिकांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर, त्यांना तसा आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, दलित नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशीही मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि नंतर दलितांवर करण्यात आलेल्या पोलीस अत्याचारास परभणीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. भाजप-प्रणित महायुतीचे नव्या पेशवाईचे भ्रष्ट सरकार राज्यात आरूढ झाल्यावर लगेच प्रशासनातील मनुवादी मुजोर झाल्याचेच या घटना निदर्शक आहेत. राज्य शासन आणि प्रशासनाच्या या जातीय वृत्तीचा माकप निषेध करत असून जनतेने रस्त्यावर उतरून संविधानाच्या मार्गाने आपला संताप व्यक्त करावा, असे आवाहन करत आहे. महाविकास आघाडी आणि आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेला आजचा महाराष्ट्र बंद निर्धाराने आणि शांततेने यशस्वी करावा, असे आवाहनही माकप जनतेला करत आहे.राज्यातील सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी, संविधानाचे रक्षण करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रत्येक सैनिक प्रयत्नांची पराकाष्ठा करील, असे वचन सर्व दलित, श्रमिक व पीडितांना पक्ष देत आहे, असे डॉ. उदय नारकर यांनी सांगितले.