ठाणे : तरुणांना विशेषतः आदिवासी तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देताना काँसिल ऑफ एज्युकेशन अँड डेव्हलपिंग प्रोग्राम संस्थेतर्फे (सिईडीपी) ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे शंभराहून अधिक वनवासी तरुणांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे.
सीईडीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम शेख म्हणाले संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित करताना सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून अल्प उत्पन्न असणाऱ्या आदिवासी तरुणांना मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. त्यानुसार अशासकीय समाजसेवी संस्थांनी निर्देशित केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची (युजीसी) मान्यता असलेल्या विविध महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले. या विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले. या तरुणांना त्यामुळे विविध आस्थापनामध्ये नोकऱ्या मिळाल्या असून, काही जणांनी आपापल्या विभागात स्वतःचे उद्योग सुरु केले आहेत.
सिईडीपीद्वारे तरुणांना ऑटोमोबाईल, हेल्थकेअर, हॉटेल आणि विविध क्षेत्रातील औद्योगिक जगताला लागणारे कुशल मनुष्यबळ यूजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या अभ्यासवर्गाद्वारेतयार केले जाते. सिईडीपीची स्थापना २०१० साली झाली. बारावी नंतर उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक संधी आणि त्यात असणाऱ्या रोजगाराच्या बाबतीत समुपदेशन करुन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रोजगार आणि स्वतंत्र उद्योग उभारण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत सिईडीपीतून प्रशिक्षित झालेले हजारो तरुण नामांकित आस्थापनांमध्ये किंवा स्वतंत्र उद्योगात कार्यरत असल्याचे वसीम शेख यांनी सांगितले.