राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष आणि सध्याचे रा.काँ.श.प. गटाचे नेते शरद पवार हे पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई लढत आहेत. हा उद्योग त्यांनी त्यांच्या उण्या-पुऱ्या साठ वर्षांच्या राजकीय जीवनात अनेकदा केलेला आहे. निवडणुकीत यश मिळून स्थापन झालेले दोन पक्षांचे एकत्रित आघाडीचे सरकार आपल्याच नेत्याच्या “पाठीत खंजीर” खुपसून पाडण्याचा उद्योग आणि नंतर नवे टिकवणय्चा संघर्ष त्यांनी 1978 मध्ये केला. तेंव्हापासून शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर एका तेजाने तळपू लागले. त्या वेळी त्यांनी वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण यांच्या अर्स काँग्रेसचे सरकार पाडले होते. कारण त्या सरकारमधील इंदिरा काँग्रेसचे नेते नासिकराव तिरपुडे यांनी सुरु केलेले अवमान तसेच कारवायांचे सत्र. ते काही असले तरी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या इच्छे विरुद्ध तसेच त्यांना पूर्व कल्पना न देता ते बंड झाले आणि त्यामुळे दादा म्हणाले शरदने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. अर्थात पवारांना पुढे करून दादांच्या सहकारातील व राजकारणातली अनेक जुन्या मित्रांनीच ते बंड घडवले होते. याची कल्पना दादांना नंतर आली होती आणि त्यांचे व पवारांचे संबंध मित्रत्वाचे झाले होते. पण दादांच्या पाठीतील तो कथित खंजिर मात्र पवारांना आयुष्यात सतत त्रास देतच राहिला !!
पुढे शंकरराव चव्हाणांच्या विरोधात कारवाया करून दादांनीच शरद पवारांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली होती. बंडानंतर ते दोन विधानसभा निवडणुकांना सामोरे गेले, तेही इंदिरा गंधींच्या काँग्रेस बरोबर संघर्ष करीतच.
पण 1980 मध्ये त्यांच्या समवेत विरोधी पक्ष म्हणून निवडून आलेले ऐशी टक्के आमदार निकाला नंतर काही महिन्यातच पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आणि पवार एकाकी लढत राहिले.नंतर आलेली 1985 ची विधानसभा निवडणूकही शरदरावांनी विरोधी बाजूनेच लढवली आणि पुन्हा तितकेच 54 आमदार निवडून आणले. मग मात्र त्यांनी विरोधी पक्षाचा संसार आटोपता घेतला व ते पुन्हा राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आपला समाजवादी काँग्रेस पक्ष विलीन करून मोकळे झाले.
तिथून त्यांची तिसरी अस्तित्वाची लढाई सुरु होती. आधी राजीव गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसमध्ये टिकणे हेच आव्हान होते. इंदिरा गांधींशी जे प्रामाणितक राहिले होते असे शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, रामराव आदिक अशा जुन्या एकनिष्ठ नेत्यंच्या विरोधात पवार गट असा तो संघर्ष सुरु होता. 1990 नंतर शरदरावांना महाराष्ट्रात ठेवायचे की दिल्लीत काम करू द्यायचे असा एक पेच काँग्रेसमध्ये होता. तोही एक मोठा अस्तित्वाचाच संघर्ष व लढाई शरद पवारांसाठी होती. सोनिया गांधींच्या गटाच्या इच्छे विरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शरद पवार जिद्दीने लढले आणि सीताराम केसरींच्या हातून पराभूत झाले. ती लढाई त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन करे पर्यंत म्हणजे 1999 पर्यंत सुरुच राहिली.
या नंतरचा, गेल्या पंचवीस वर्षांचा काळ हा शरद पवारांसाठी राजकीय सुखाचा काळ, शांततेच काळ, कदाचित म्हणता येईल. पण त्यातही काँग्रेसच्या व सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली निवडूक लढल्यानंतर काही तासातच काँग्रेस बरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे ही शरदरावांच्या राजकीय विश्वासाऱ्हते पुढे प्रश्नचिन्ह करणारी कृती होती पण शरद पवारांनी ती केलीच.
ते सरकार त्यांच्या सुदैवाने पंधरा वर्षे टिकले. त्याही काळात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुप्त व उघड संघर्ष सुरुच होता. पण त्या काळात क्रमशः राष्ट्रावदी काँग्रेस पक्षातील निर्णय प्रक्रियेत शरद पवारांचे पुतणे व राजकीय वारसदार गणले गेलेले अजितदादा पवार यांच्याकडे मोठा वाटा येत गेला. वयाने साठी-पासष्ठी ओलांडलेल शरद पवार हे थोडे बाजूला होत होते असे जनतेला वाटत होते. पण तसे ते प्रत्यक्षात नव्हतेच !!
दिल्लीत खासदारकीची संधी त्यांनी आपली लेक सुप्रिया पवार-सुळे यांना दिली. जावई उद्योजक सदानंद सुळे हे सीकेपी असून बाळासाहेब ठाकरेंच्या नात्यातील होते. त्या कारणाने असेल वा राज्यसभेचे सदस्य वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या रा.काँ.च्या व काँग्रेसच्या आवाहनामुळे असेल पण सुप्रिया यांना त्या पहिल्या राज्यसभा टर्ममध्ये बिनविरोध विजय मिळून गेला.
पण लगेचच सुप्रिया की अजित हा संघर्ष पक्षात सुरु झाला. त्याचे कुटुंबातही पडसाद उमटत नसतीलच असे नाही. पवार घराण्यातील अनेक सोयरिकी याही राजकीय होत्या. त्यांची काही व्याही व जावई मंडळी ही देखील तालेवार राजकीय घराण्यातील होते. बहिणीचे यजमान एन डी पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते राहिले. तर अजितदादांची सोयरीक उस्मानाबादेतील तेरच्या पद्मसिंह पाटील यांच्या घरात जमली. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा या अजितदादांच्या पत्नी असून अशी अनेक नाते मंडळी विविध राजकीय पक्षात कार्यरत आहेत.
पण आता सुप्रिया की अजित या प्रश्नाचे कोरडे रोख-ठोक उत्तर देण्याची वेळ शरद पवारांवर आलेली असून त्यांच्या राजकीय जीवनातील आणखी एक अस्तित्वाची लढाई या निमित्ताने सुरु झालेली आहे.
गेल्या जूनमध्ये अजितदादा पवार व प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस आमदार सोबत घेतले. रा. काँच्या लोकसभेतील चार पैकी एक खासदार सुनील तटकरें हेही दादंसोबत होते. या नेत्यांनी राष्ट्रावदी काँग्रेस आमचीच असा अधिकृत दावा ठोकला. तेंव्हापासून शरद पवारांचा पुन्हा एकादा अस्तित्वाचा संघर्ष सुरु झाला आहे. तो कदाचित या लोकसभा निवडणुकी नंतर संपूनही जाईल.
पण मुळात तो पवार विरुद्ध पवार असा संघर्ष हे का की दोन राष्ट्रीय राजकीय विचारधारांतील हा संघर्ष आहे ? शरद पवारंचे उत्तर असे आहे की, हा काका-पुतण्या आणि नणंद-वहिनी असा, म्हणजेच पूर्णतः पवारांचा कौटुंबितक स्वरुपाचाच संघर्ष आहे. पण भजाप नेते व पवारां इतकेच चलाख राजकारणी ठरलेले देवेन्द्र फडणवीस यांनी त्या व्यक्तीगत संघर्षाला एक मोठे राष्ट्रीय परिमाण दिले आहे.
फडणवीस म्हणतात की, “शरद पवार हे राहुल गांधींच्या बाजूनेच उभे आहेत. नरेंद्र मोदी हे देशाच्या भवितव्यासाठी निराळी लढाई लढत असताना आता बारामतीकरांना हे ठरवायचे आहे की ते राहुल गांधींच्या बरोबर राहणार आहेत की नरेंद्र मोदींच्या बरोबर उभे राहणार आहेत…!” आता अजितदादांनी नवीन मुद्दा कढला आहे. त्यांनी बारामतीकरांना म्हटले की “तुम्ही आधी मुलाला खासदरकीची संधी दिलीत. म्हणजे मला खासदार केलेत. नंतर वडिलांना म्हणजे पवार साहेबांना खासदारकी दिलीत. नंतर लेकीला म्हणजे सुप्रिया सुळेंना तुम्ही संधी दिलीत. आता सुनेला संधी द्यायला काय हरकत आहे?!” हाही कौटुंबिक जवळिक साधण्याचा व मतदारांना भावनिक साद घालणारा प्रकार आहे. त्याला उत्तर म्हणून ओरिजिनल पवार आणि बाहेरून आलेले पवार असा नवा भेद शरद पवारांनी उभा केला आहे. लेक ही मूळची पवार आहे, तिला मत द्या. सून ही अन्य घरातून येऊन पवार झाली. ती ओरिजिनल पवार नाही. तिला मत देऊ नका, असे शरदरावांचे ताजे आवाहन आहे. आणि हे त्यांच्या आजवरच्या स्त्री सबलीकरणाच्या साऱ्या तत्वज्ञानाला हरताळ फासणारे असे विचित्र ठरते आहे.
शरद पवारांनी आयुष्यभर स्त्रीच्या हक्कासाठी भूमिका घेतली. आता अखेरीच्या टप्प्यात ते सुनेवर अन्याय करणारी भूमिका घेत असून, सून ही खरी या घरातील नाहीच, अशी धारणा तयार करत आहेत. हे राज्यातील जनतेलाही रुचणारे व पटणारे नाही. राज्यातील साऱ्या सुना व लेकींमध्ये एक निराळी फूट पडणारे असे हे डेंजरस विधान असून तेच शरद पवारांना महागात पडणारे ठरू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *