जगातील प्रत्येक देशाच्या माणसांची संस्कृती असते तशीच ती प्राण्यांच्या अनेक प्रजातीचीही असते असे आता विज्ञानाने सांगितले आहे. संस्कृती म्हणजे योग्य रीतीने आखून दिलेले आणि सामाजिक पातळीवर शिकलेले व्यवहार असा अर्थ लावला जातो. परंतु माणसांच्या अतिशय जवळची मानली गेलेली चिंपांझींची प्रजाती एका वेगळ्या स्तरावर पोचली आहे असे अभ्यासकांना आढळले. त्यांना असे दिसले की ही प्रजाती या संस्कृतीची शिकवण पिढी दर पिढी पुढील पिढीपर्यंत पोचवीत आहे. त्यातच महत्वाचे असे की त्यात गरजेनुसार नाविन्य देखील आणले जात आहे.
संशोधकांनी यासाठी चिंपांझींच्या १५ जातींची निवड केली आणि त्यांच्यावळ लक्ष ठेवून त्यांची जनुक विषयक माहितीही गोळा केली. त्यात असे दिसले की या प्रजातींनी काही अतिशय गुंतागुंतीची साधने तयार केली आहेत. झाडाच्या फांदीच्या काडीचे ब्रश सारखे साधन बनवून त्याचा उपयोग आहारासाठी झाडांवरील कीटकांना पकडण्यासाठी केलेला दिसला. या संशोधनाच्या प्रमुख कॅसँड्रा गुणशेखरन म्हणतात की त्यांच्या तंत्रज्ञान वापरण्याच्या अशा कृतीवरून या प्रजातीमध्ये काही ना काही सामाजिक शिक्षण आणि त्याचा प्रसार हे दोन्ही होत असावे असे दिसते. हे नाविन्य अधिक गुंतागुंतीपर्यंत देखील पोचते आहे असे दिसते तेव्हा त्यांच्या उत्क्रांतीबद्दलचे पुरावेच मिळत असतात. या प्रजातीच्या परंपरा सांस्कृतिकही आहेत असे मत उत्क्रांती तज्ञ थॉमस मॉर्गन यांनीही म्हटले आहे.
चिंपांझी याना मानवाचे सर्वात जवळचे जीवित नातेवाईक मानले गेले आहे आणि ते ज्या सांस्कृतिक विकासाचे पुरावे देत आहेत त्यावरून हे सिद्ध देखील होत आहे. माणसाच्या देखील अनेकानेक पिढ्यांनी परिश्रम करून निर्माण केलेली संस्कृती आपल्याला मिळाली आहे आणि आपण विकसित प्रजाती म्हाणून मिरवीत आहोत.
गेल्या चार दशकांमध्ये आंतर-प्रजाती मध्ये संस्कृती आणि सांस्कृतिक उत्क्रांती याबद्दल तुलनात्मक अभ्यास केला जात आहे. संशोधकांना असे दिसले की माणूस जिला “संस्कृती” असे नाव देतो ती खरे तर सामाजिक व्यवहारातून शिकलेल्या काही स्वभावांचा समूह असतो. परंतु या नव्या संशोधनात असे दिसले की चिंपांझी यांनी यात सुधारणा करून ती एक नव्या स्तरावर नेली आहे. आता हे चिंपांझी आपली संस्कृती आपल्या नंतरच्या पिढीकडे सुपूर्द करताना दिसताहेत आणि त्यातील प्रत्येक बाबतीत काही ना काही सुधारणा घडवीत आहेत. हे तंत्र या प्राण्यांच्या मादीने अगोदर आत्मसात केले आणि नंतर ते प्रसारित झाले असाही निष्कर्ष निघाला. पिढी दर पिढी हे तंत्रज्ञान अधिक गुंतागुंतीचे होत गेले आहे. अशा प्रकारची संकलित संस्कृती केवळ आणि केवळ माणूस या प्राण्यामध्येच आहे असे आजवर मानले गेले आहे. आणि त्यामुळे मानवी संस्कृती कशामुळे वेगळी ठरली असावी याबद्दल चर्चा सुरु झाली आहे असे सायंटिफिक अमेरिकन या विज्ञान नियतकालिकातील एका प्रबंधात म्हटले आहे.
त्यामुळे माणसाने आता आपल्या संस्कृतीचा आदर नक्कीच करावा परतू प्राण्याच्या संस्कृतीला कमी समजू नये असे म्हणावेसे वाटते.
प्रसन्न फीचर्स
