पोलिस उपायुक्तांची घेतली भेट

 

कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगीधाम मधील मराठी कुटुंबाच्या मारहाणीचे प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून, या प्रकरणी राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि सोसायटीमधील रहिवाशांनी कल्याण परिमंडल 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याला त्वरित अटक करून त्याचे निलंबन करण्यात यावे, गुन्हा दाखल करण्यास उशीर करणाऱ्या एपीआय लांडगे यांचे पण निलंबन करा आदी मागण्या यावेळी या नगरिकांनी केल्या. आरोपीला अटक न केल्यास उद्या दुकाने बंद करून कल्याण मुरबाड रोड  बंद करणार असल्याचा इशारा यावेळी पोलिसांना देण्यात आला.
या शिष्टमंडळात मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, मनसेच्या महिला शहर अध्यक्षा कस्तूरी देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी, रुपेश भोईर, माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव, सचिव अतुल सरगर, योगीधाम व्यापारी संघटनेचे उमेश वाघ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, जिल्हा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, गणेश जाधव, अनघा देवळेकर, मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय जोगदंड आदींसह प्रमुख पदाधिकारी यांच्यासह योगीधाम येथील स्थानिक नागरिकही उपस्थित होते.
खडकपाडा पोलिसांनी या अखिलेश शुक्लाला पाठीशी घालण्यासह या मारहाणीत गंभीर जखमी कुटुंबाला मात्र अन्याय वागणूक दिल्याचे गंभीर आरोप या शिष्टमंडळाने केले. या प्रकरणी आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी वेगळीच कलमे दाखल केली तसेच शुक्ला पोलीस ठाण्यात येऊनही त्याला ताब्यात न घेता पळून जाण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोपही यावेळी बैठकीत करण्यात आला.
देशमुख कुटुंबावर भ्याड हल्ला करणाऱ्या शुक्लाचा निषेध करण्यात येत असून, मुख्य आरोपीला अटक न केल्यास उद्या योगिधाम परिसर बंद ठेवण्यात येणार असून या बंदचे काही विपरीत परिणाम झाल्यास त्याला सर्वस्वी पोलिस प्रशासन जवाबदार असेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला.
अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात अधिकारी असल्याने पोलिस प्रशासन त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. 48 तास होऊन देखील अखिलेश शुक्ला याला अटक होत नाही. या प्रकरणामुळे  मराठी माणूस भडकला तर इथे राहणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयाला धोका निर्माण होऊ शकतो. पोलिसांनी 109 कलम न लावल्याने त्यांची पक्षपाती भूमिका दिसून येत असून हे कलम न लावल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी दिला.
तर या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी देशमुख कुटुंबावर हल्ला करणाऱ्या अखिलेश गुप्ता याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करत राडा करणारे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मनसेला पराभव पचवता आला नसल्याने मनसेने या प्रकरणात मराठी परप्रांतीय वाद केल्याची टीका देखील अरविंद मोरे यांनी केली आहे.
दरम्यान योगिधाम येथील माय मराठी प्रतिष्ठान आणि योगिधाम व्यापारी संघटना यांनी या प्रकरणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचे आणि कलमे देखील कमी लावल्याचा आरोप केला आहे. शुक्ला याला अटक करण्यासह त्याला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाईची मागणी केली.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *