स्टंप व्हीजन
स्वाती घोसाळकर
मुंबई- वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा रोहीत शर्मा आज हिरो तर कॅप्टन हार्दीक झिरो ठरला. शेवटच्या षटकात बाँलिंग टाकण्याचा अट्टाहास कॅप्टन हार्दीकच्या अंगलटीस आला. चेन्नईने हार्दीकच्या या ओव्हरमध्ये २६ रन्स वसूल केले. आणि हेच रन्स अखेर मुंबई इंडियन्सच्या पराभवास कारणीभूत ठरले. रोहीत शर्माने ६३ बॉल्समध्ये झुंजार नाबाद १०५ रन्सची खेळी केली खरी पण शेवटी मुंबईच्या विजयाला २१ रन्स कमी पडले.
२०७ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने जोरदार सुरुवात केली. खास करून रोहित शर्माने आपला नैसर्गिक खेळ केला. इशान किशनबरोबर त्याने धावफलक हलता ठेवला. दोघांनी मिळून ७० धावांची भागीदारी केली. ही जोडी मोठा स्कोअर करेल असं वाटतं असताना पथिरानाने इशान किशनची विकेट घेतली. शार्दूलच्या अप्रतिम कॅचमुळे इशान पॅव्हेलियनमध्ये परतला. पण याचा कोणताही दबाव रोहित शर्माने आपल्या खेळावर होऊ दिला नाही. त्याने तडाकेबाज फलंदाजी सुरूच ठेवली. रोहित अवघ्या ३० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण जसं जशी समोर विकेट गेल्या मुंबई इंडियन्स आणि रोहितवर आलेला दबाव जाणवत होता. १३ ओव्हरनंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईवर दबाव आणला. खासकरून पथिरानाने अचूक टप्प्यात गोलंदाजी करत मुंबईला रोखलं. आणि मुंबई इंडियन्सला २० ओव्हर अखेर ६ विकेट गमावत १८६ धावांपर्यतच मजल मारता आली. पण महत्वाची चांगली गोष्ट म्हणजे मुंबईचा हिटमॅन रोहित शर्माने संयमी खेळ करत आपलं शतक पूर्ण केलं. मात्र तोपर्यंत हातातून मॅच गेल्यामुळे रोहितने आपलं शतक सेलिब्रेट केलं नाही. रोहीतने आज टी२० मधिल पाचशे सिक्सर मारण्याचा विक्रम केला.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने नेहमीच आपला दबदबा ठेवलाय. जर चेन्नईविरुद्ध सरासरी पहिली तर घरच्या मैदानावर मुंबईने ७ विजय नोंदवले आहेत. तर चार सामन्यात वानखेडेवर चेन्नई विजयी झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरला होता. चेन्नईमधला मुंबईचा लोकल बॉय अजिंक्य राहणे आणि रचीन रवींद्र यांनी इनिंगची सुरुवात केली. पण अजिंक्य पाचच धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाडबरोबर राचीनने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी आक्रमक फटकेबाजी करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या खरपूस समाचार घेतला. खास करून ऋतुराजने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ३३ चेंडूत हाफ सेंच्युरी ठोकली. दोघं खेळताना असं वाटत होतं की चेन्नई अडीचशेच्या वर धावा करतील. पण कर्णधार हार्दिक पंड्याने घातक ऋतुराजला बाद करत चेन्नईच्या धावांच्या गतीला ब्रेक लावला. चेन्नईचा संघ २०० चा पल्ला गाठणार का हा प्रश्न निर्माण होत होता. पण २० व्या ओव्हरमध्ये पंड्याने मिचेलला बाद केल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एकाच आवाज ऐकू आला. ‘धोनी.. धोनी’. धोनीनेही आल्या आल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केला. त्याने लागोपाठ तीन सिक्स मारत वानखेडेवर जणू धमाकाच केला. त्यामुळे चेन्नईने चार गडी गमावत २०६ धावा केल्या. महत्वाचं म्हणजे शेवटची ओव्हर कर्णधार हार्दिक पंड्याने टाकली ज्यात २६ धावा काढल्या गेल्या.
सामान्यादरम्यान वानखेडेचा आसमंत पिवळा झाला होता. मुंबई इंडियन्सचा सामना असला तरी अख्ख स्टेडियम धोनीमय झालं होतं. ब्लु जर्सीची जागा ही यल्लो जर्सीने घेतली होती. आपल्या लाडक्या थलाला बघण्यासाठी वानखेडे स्टेडियम हाऊसफूल होतं. धोनीनेही आपल्या फॅन्सना निराश केलं नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत प्रेक्षकांचा ‘पैसा वसूल’ केला.