मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे यांच्या चतुर्थ स्मृतीदिनानिमित्त १५ वर्षाखालील शालेय मुलांमुलींची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने होणाऱ्या कॅरम स्पर्धेतील पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.
ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या सहकार्यामुळे सदर स्पर्धेतील पहिल्या आठ सबज्युनियर कॅरमपटूना राज्य क्रीडा दिनानिमित्त १५ वर्षाखालील सुपर लीग कॅरम चम्पियनसाठी होणाऱ्या स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार आहे. दोन्ही स्पर्धा दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई सभागृहात मोफत होणार आहेत. सहभागी उदयोन्मुख खेळाडूंना विनाशुल्क मार्गदर्शन देखील लाभणार आहे. इच्छुक शालेय १५ वर्षाखालील मुलांमुलींनी प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी अविनाश नलावडे अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २२ डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.
स्व. प्रल्हाद नलावडे यांनी स्थानिक पातळीवरील उदयोन्मुख कॅरम खेळाडूंना मोफत कॅरम स्ट्रायकर देत प्रोत्साहन दिले होते. विशेषतः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत झालेल्या पहिल्या मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेमधील बहुतांश शालेय खेळाडूंना त्यांनी विनाशुल्क कॅरम स्ट्रायकर देऊन कॅरमकडे आकृष्ट केले होते. त्यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी तसेच शेकडो पालक वर्गाने त्यांचे विशेष कौतुक केले होते.
०००००