ठाणे : ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२५ मध्ये दोन दिवसीय ‘प्रतिरूप मुलाखत (MOCK-INTERVIEW)’ सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत १६ जून २०२४ रोजी यूपीएससी पूर्व परीक्षा-२०२४ आयोजित करण्यात आली होती. तर, २० ते २९ सप्टेंबर २०२४ या काळात यूपीएससीची मुख्य परीक्षा झाली. या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, दोन दिवसीय ‘प्रतिरूप मुलाखत (MOCK-INTERVIEW)’ सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिरुप मुलाखतीत (MOCK INTERVIEW) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या cdinstitute@thanecity.gov.in या ई-मेलवर आपले DAF-2 ॲप्लीकेशन सादर करावे. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या DAF-2 ॲप्लीकेशनचे संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून विश्लेषण (DAF Analysis) करण्यात येईल. विद्यार्थ्यांना या प्रतिरूप मुलाखतीच्या सरावाचा युपीएससीच्या मुलाखतीसाठी मार्गदर्शन म्हणून उपयोग होईल. तरी, इच्छूक विद्यार्थ्यांनी गुरूवार, २६ डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संस्थेच्या २५८८१४२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले आहे. या ‘प्रतिरूप मुलाखत (MOCK-INTERVIEW)’ सत्रातील मुलाखत पॅनलमध्ये के.पी. बक्षी, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव – महाराष्ट्र शासन, सौरभ राव, ठाणे महानगरपालिका आयुक्त, डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त- रेल्वे मुंबई, श्रध्दा पांडे, कमांडंट ३८ बटालियन, अलिगढ, मोक्षदा पाटील, आयपीएस अधिकारी, राजलक्ष्मी कदम, अतिरिक्त संचालक, डीआरआय, मुंबई, अक्षय पाटील, उपआयुक्त कस्टम विभाग, नेहा निकम, सीआययू, न्हावा शेवा, मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ मृदुल निळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक भूषण देशमुख आदी मान्यवरांचा समावेश आहे. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना आणि इतर संलंग्न परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे. आजतागायत संस्थेतील एकूण ८१ प्रशिक्षणार्थींनी यूपीएससी आणि ४०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींनी एमपीएससी व तत्सम स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले आहे.