पुणे : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षात नाराजी पसरली होती. त्यापैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज आमदारांची नाराजी दुर करण्यात शिंदे यशस्वी ठरले.
मंत्रिमंडळ विस्तारात आपणास संधी मिळेल अशी आशा असतानाही अनेकांना डावलण्यात आल्याने काहींनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे होती.
शिवतरे, यांनीही थेट नाराजी दर्शवली. विशेष म्हणजे विजय शिवतारे यांनी यानंतर मंत्रीपद दिले तरी घेणार नाही अशा परखड शब्दात आपली भूमिका मांडली होती. मात्र, ५ दिवसानंतर त्यांची नाराजी दुर झाल्याचं आज दिसले. मी नाराज नव्हतो, एकनाथ शिंदे यांचा विश्वासू सहकारी हे पद मला जास्त जवळचे आहे, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटातील नाराज आमदार विजय शिवतारे यांनी भूमिका स्पष्ट केली.
नागपूरमधील विधिमंडळाचे अधिवेशन सोडून विजय शिवतारे मतदारसंघात परतले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आलो कारण दोन तीन दिवसात जे काही झालं त्यामुळे माझा मूड गेला. पात्रता असताना देखील डावले गेलं, डावलण्यामागे एकनाथ शिंदे यांची करणे असतील. मला मंत्री पद का नाकारले मला माहित नाही, पण ठीक हे आहे कुटुंबातील प्रश्न आहे. तो आम्ही बघू मात्र मी नाराज झालो होतो. मंत्रिपद मिळेल म्हणून कुटुंबातील सगळे लोकं नागपुरात आले. एखादा माणूस निधन झाल्यावर जसा मातंग होतो तसा मातंग झाला, त्यामुळे मी अस्वस्थ होतो. कार्यकर्ते गाड्या घेऊन आले होते, त्यांचा अपेक्षाभंग झाला. कॅपिसिटी होती म्हणून वाटत होते मंत्रिपद मिळेल, पण तसे झालं नाही. मंत्री पद मिळणार नाही हे दोन दिवसापूर्वी मला सांगितले असते तर शांत राहिलो असतो, उलट मी थांबून दुसऱ्याला मंत्रिपद दिले असते, अशा शब्दात विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र,
मला मंत्रिपद मिळेल, अशी माझ्या घरच्यांना अपेक्षा होती. शपथविधी सोहळ्यासाठी 375 गाड्या तब्बल दहा तासांचा प्रवास करून नागपूरला आल्या होत्या, कार्यकर्ते देखील खूपच आग्रही होते. मात्र, मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी मी थोडा भावूक झालो आणि अनेक गोष्टी बोलून गेलो. पण माझ्या मनात असे काही नाही, पुढील काळात एकनाथ शिंदे जे पद देतील ते मला मान्य असेल, अशा शब्दात विजय शिवतारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रकाश सुर्वेंची देखील नाराजी दूर
राज्यातील महायुतीच्या सरकारच्या मंत्रिपदाचे वाटप झाल्यानंतर ज्यांनी उघडपणे आपली नाराची व्यक्त केली होती, त्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील मी नाराज नव्हतोच असे आज सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात नक्कीच चांगली संधी देतील, हा एक परिवार आहे, मी थोडासा दुःखी होतो. घरी आईची तब्येत ठीक नसल्याने आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी मुंबईला परतलो होतो, असे प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे.