ठाणे : ग्रामीण भागातील बालकांना अंगणवाडीत येण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांचा शैक्षणिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या स्मार्ट करण्याकडे जिल्हा परिषदेचा विशेष कल आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वर्षेभरात ७४ नव्या स्मार्ट अंगणवाड्या सुरु झाल्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी खेळणी, विविध शैक्षणिक तक्के, भिंतीवर विविध चित्र रेखाटली आहेत. तसेच टीव्हीच्या माध्यमातून या बालकांना विविध बालसाहित्य दाखविले जाते, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मार्फत देण्यात आली.
बालकाच्या वाढीचा आणि विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. वयाच्या सहाव्या वर्षापासून बालकाची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वाढ होण्यास सुरुवात होते. बालकांना या वयात शाळेत बसण्याची सवय, अक्षरांची ओळख व्हावी यासाठी पालक आपल्या पाल्याला अंगणवाडीमध्ये पाठवत असते. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पूर्वी या अंगणवाड्यांची दुर्दशा होती. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये फारसे बालक जात नव्हते. परंतु, कालांतराने या आंगणवाड्यांचे रुपडे पालटले.
आता, या अंगणवाड्यांची वाटचाल स्मार्ट होताना दिसत आहे. जिल्ह्यात वर्षभरापूर्वी केवळ ४९७ स्मार्ट अंगणवाड्या होत्या. त्यात, यंदाच्या वर्षी आणखी ७४ स्मार्ट अंगणवाड्यांची वाढ झाली आहे. या अंगणवाड्यांमध्ये टिव्ही, भितींवर विविध प्राण्यांची – पक्ष्यांची चित्र रंगवलेली, बालकांना बसण्यासाठी खुर्च्या, इंग्रजी, मराठी अक्षरांचा तक्ता, खेळण्याचे विविध साहित्यासह सौरऊर्जा यंत्रणा, ई-लर्निंग, उपलब्ध आहेत. या अंगणवाड्या स्वयंसेवी संस्थाच्या मार्फत उभारण्यात आल्या आहेत.
खासगी अंगणवाड्यांच्या स्पर्धेत टिकायचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्या या स्मार्ट करण्यावर भर दिला जात आहे. डिजिटल शिक्षण सुविधेसह अभ्यासाचे विविध साहित्य या अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध आहे. अनेक खासगी कंपन्या, सामाजिक संस्था आणि शासनाच्या मदतीने हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे प्रयत्न आहेत. – संजय बागुल, महिला बालविकास विभाग प्रमुख, ठाणे जिल्हा परिषद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *