भारताचा अव्वल ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. रविचंद्रन आश्विन याच्या निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेट रसिकांना धक्का बसला कारण त्याची निवृत्ती अनपेक्षित होती. आश्विन असा काही निर्णय घेईल असे कोणालाच वाटले नव्हते कारण त्याच्यात अद्याप बरेचसे क्रिकेट शिल्लक होते. जरी तो आज ३८ वर्षाचा असला तरी तरी तो फिट आणि फॉर्मात होता. सहा महिन्यांपूर्वीच इंग्लंड विरुद्धच्या राजकोट कसोटीत त्याने ५०० बळींचा टप्पा गाठत विक्रमी कामगिरी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळी घेणारे मोजकेच गोलंदाज आहेत त्यात आश्विनचा समावेश झाला होता. भारताच्या दृष्टीने पाहायला गेले तर कसोटीत पाचशे बळी मिळवणारा तो भारताचा दुसराच गोलंदाज आहे. या आधी अशी कामगिरी भारताचा महान लेगस्पिनर अनिल कुंबळे यालाच करता आली आहे. आश्विनने ५३७ कसोटी बळी घेतले आहेत आणि त्याच्यापुढे फक्त अनिल कुंबळे होता अनिल कुंबळे याने कसोटीत ६१९ बळी घेतले आहेत याचाच अर्थ दोघांमध्ये आता फक्त ८२ बळींचे अंतर होते. आश्विन आता ३८ वर्षाचा आहे. त्याचा फॉर्म आणि फिटनेस उत्तम आहे त्यामुळे तो आणखी एक दीड वर्ष सहज खेळू शकला असता. तो जर आणखी एक दीड वर्ष खेळला तर तो अनिल कुंबलेला मागे टाकून भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला असता. मात्र त्याने त्याची वाट न पाहता निवृत्ती घोषित केली त्यामुळेच त्याची निवृत्ती क्रिकेट रसिकांना चटका लावून गेली. अर्थात त्याच्या या कृतीतून त्याच्या विषयीचा आदर आणखीन वाढला. आपण विक्रमासाठी नाही तर देशासाठी खेळलो हे त्याने कृतीतून सिद्ध केले. रविचंद्रन आश्विन हा जगातील सर्वाधिक धोकादायक गोलंदाज समजला जात असे. विशेषतः भारतीय खेळपट्ट्यांवर तर तो अधिक धोकेदायक ठरत असे. त्याने मिळवलेल्या ५३७ बळीपैकी ३८३ बळी त्याने भारतात घेतल्या आहेत. परदेशातही त्याची कामगिरी चांगली आहे. परदेशातही त्याने बळी मिळवलेले आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्याने सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने केवळ गोलंदाज म्हणून नाही तर फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. कसोटीत त्याने सहा शतके झळकावली आहेत. कसोटीत सहा शतके झळकावणे ते ही सातव्या, आठव्या क्रमांकावर येऊन ही साधी गोष्ट नाही. कसोटीत ५०० बळी आणि ६ शतक झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. अशी कामगिरी एक चांगला अष्टपैलू खेळाडूच करू शकतो. आश्विनने हे करून आपण केवळ गोलंदाज नसून अष्टपैलू खेळाडू आहोत हे सिद्ध केले आहे. आश्विनने कसोटीत ११ वेळा मालिकाविराचा पुरस्कार जिंकला आहे हा देखील एक विक्रमच आहे. मागील दशकभरात भारताने कसोटीत जे वर्चस्व गाजवले त्यामागे आश्विन हे एक महत्वाचे कारण आहे. आश्विनने केवळ कसोटीतच नाही तर एकदिवसीय आणि टी २० सामन्यातही चमकदार कामगिरी केली. एकदिवसीय आणि टी २० सामन्यातही त्याने खूप बळी मिळवले आहे. कसोटी प्रमाणेच एकदिवसीय आणि टी २० सामन्यातही त्याने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. आश्विन हा भारताचा खराखुरा मॅच विनर खेळाडू आहे. २०११ साली जेंव्हा त्याने भारताकडून कसोटीत पदार्पण केले तेंव्हा अनिल कुंबळे निवृत्त झाला होता तर हरभजन सिंगचा उतरता काळ सुरू झाला होता. या दोघांनी जवळपास दीड दशके भारतीय फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळली होती त्यांच्या नंतर भारतीय फिरकीची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न होता कारण त्यावेळी त्यांची जागा घेणारा तर सोडाच पण त्यांच्या जवळपास जाऊ शकणारा एकही फिरकी गोलंदाज दिसत नव्हता. आश्विन ज्यावेळी आला त्यावेळीही तो इतकी मोठी मजल मारेल असे भाकीत कोणी केले नव्हते मात्र त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि भारताला अनेक अप्रतिम विजय मिळवून दिले. त्यामुळेच तो आज महान गोलंदाजांच्या पंगतीत जाऊन बसला. रविचंद्रन आश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट ही गाजवून सोडले होते. त्याने रणजी सामन्यात सातत्याने बळी मिळवले मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती आयपीएलने. आयपीएलमध्ये आश्विनने चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधीत्व केले. मुथय्या मुरलीधरन हा चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख गोलंदाज होता. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला गोलंदाजीची सुरुवात फिरकीने करायची होती मात्र मुरलीधरन सुरुवातीलाच गोलंदाजी करण्यास तयार नसल्याने धोनीने चेंडू आश्विनकडे सोपविला. आश्विनने संधीचे सोने करीत प्रतिस्पर्धी संघाची सलामीची फळी कापून काढण्याची कामगिरी केली आणि तिथेच धोनीचा आश्विनवर विश्वास बसला. आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याने धोनीने त्याला भारताकडून खेळायची संधी दिली. आश्विनने धोनीने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला आणि भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. कसोटीत तर त्याने करामत केली. खेळपट्टी कुठलीही असो आपल्या फिरकीने आश्विन त्यावर रंग भरत असे. त्याच्या बोटांमध्ये जादू होती. त्याच्याकडे शेन वॉर्न सारखे ग्लॅमर नव्हते, मुथय्या मुरलीधरन सारखी दहशत त्याच्याकडे नव्हती, कुंबळे, हरभजनसिंग सारखी लोकप्रियता देखील त्याला मिळाली नाही तरीही तो या दिग्गजांच्या पंगतीत जाऊन बसला कारण त्याची शैली वेगळी होती. त्याने कोणाचीही कॉपी केली नाही. त्याने स्वतःची वेगळी शैली विकसित केली. जगातील एक सर्वोत्तम हुशार फिरकी गोलंदाज म्हणून त्याने अल्पावधीतच ख्याती मिळवली. कारण चेंडू बोटांनी, मनगटांनी वळत असला, तरी आधी डोक्यात तो समोरच्या फलंदाजाला कसा टाकायचा याचे चित्र तो आधीच तयार करून ठेवायचा म्हणूनच त्याच्या चेंडूचा सामना करताना भल्या भल्या फलंदाजांची भंभेरी उडायची. तो आपल्या गोलंदाजीत सतत नवनवीन प्रयोग करायचा. आर्म बॉल, कॅरम बॉलचा तो खुबीने वापर करायचा. ऑफ स्पिनर असूनही तो मध्येच लेगब्रेक आणि गुगली टाकायचा त्यामुळे फलंदाजांची दांडी गुल व्हायची. त्याने आता निवृत्ती स्वीकारल्याने त्याची ती गोलंदाजी पुन्हा पाहायला मिळणार नाही अर्थात तो आयपीएल आणि क्लब क्रिकेट खेळेल पण चार षटकांच्या क्लब क्रिकेट मधील त्याच्या गोलंदाजीला कसोटी क्रिकेट मधील गोलंदाजीची सर येणार नाही. कसोटीत त्याची उणीव नेहमीच जाणवत राहील. त्याच्या तोडीचा तर सोडाच त्याच्या जवळपास पोहचू शकेल असा कोणताच गोलंदाज आज भारतात नाही त्यामुळेच त्याच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट मध्ये मोठी पोकळी निर्माण होणार आहे. निवृत्ती नंतर रविचंद्रन आश्विनने त्याची ऑफ स्पिनची कला तरुण, युवा होतकरू खेळाडूंना शिकवावी आणि त्याच्यासारखे खेळाडू त्याने देशाला निर्माण करून द्यावेत हीच त्याच्याकडून क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे रविचंद्रन आश्विनला निवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *