ऑनलाईन बाजारपेठांमध्ये विशेष सवलती

ठाणे : नाताळ सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील बाजारपेठा तसेच ऑनलाईन बाजारपेठांमध्ये नाताळ सणांशी निगडित असणाऱ्या विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. या वस्तूंवर विशेष सवलती देखिल देण्यात येत आहेत. ख्रिसमस ट्री, सांताचे विविध प्रकार, सांताचे पोशाख, मुखवटे, आकर्षक मेणबत्या, विद्युत रोषणाई या वस्तूंनी बाजार सजले आहे. तसेच ऑनलाईन बाजारापेठेत यशु ख्रिस्तांची कथा मांडणारे देखावे देखिल पाहायला मिळत आहेत.
ख्रिश्चन बांधव येशू ख्रिस्ताचा जन्मदिवसानिमित्त नाताळ सण साजरा करतात. यानिमित्ताने कार्यालय, गृहसंकुलन, शहरातील मुख्य बाजारपेठा, चर्च यांसारख्या विविध ठिकाणी नाताळानिमित्त आकर्षक वस्तूंनी सजावट केली जात आहे. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त यांच्या जीवनकथा मांडणारे आकर्षक देखावे साकारले जातात. या सजावटीसाठी बाजारपेठांमध्ये विविध वस्तू दाखल झाल्या आहेत. यामध्ये सांताच्या विविध प्रकारात संगीतमय सांता, पॅराशूट सांता, सांताचे पोशाख, टोपी, ख्रिसमस ट्री, आकर्षक मेणबत्या, विद्युत रोषणाईचे सामान उपलब्ध आहेत.या सर्व लहान मोठ्या आकारातील सांताची किंमत ८५० ते १२५० रुपयांपर्यंत आहे. तसेच चांदणीच्या आकारासोबतच विविध आकाराचे कंदील देखील पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे विविध रंगी काठी देखिल उपलब्ध असून सजावटीसाठी त्या ग्राहकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
सांताच्या टोपीला विशेष मागणी
प्रामुख्याने २५ डिसेंबरला अनेकजण सांताच्या पोशाखातील लाल रंगाची टोपी परिधान करतात. बाजारात या टोप्यांना सर्वाधिक मागणी आहे. या टोप्या २५ ते ४५ रूपयांना विकल्या जात आहेत. त्याचबरोबर सांताची प्रतिकृती, मोजे, मुखवटे, खेळणी, बाहुली, ख्रिसमस ट्री, मेणबत्ती, चॉकलेटचे भेटवस्तू उपलब्ध आहेत. तसेच सदिच्छा देण्यासाठी लागणारे भेटकार्ड पाहायला मिळत आहेत. सजावटीसाठी चांदण्या, चेरी, कृत्रिम पानांफुलांच्या वेली, झाडे, फळे या वस्तू उपलब्ध आहेत. या वस्तु ६०० ते १३०० रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
येशू ख्रिस्तांची कथा मांडणारे देखावे
येशू ख्रिस्तांची कथा मांडणारे अनेक देखावे विविध ठिकाणी उभारले जातात. हेच देखावे ऑनलाईन बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे देखावे ५०० रूपयांपासून ४ हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन बाजारपेठांमध्ये २० ते २५ डिसेंबर या कालावधीसाठी विशेष सवलती देखिल देण्यात येत आहेत.
कोट
नाताळ सणासाठी लागणाऱ्या वस्तु वाशी तसेच मुंबई येथुन ठाण्यातील बाजारात विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये सांताच्या पोशाखाला तसेच टोपीला ग्राहकांची मागणी आहे.
अखिलेश मिश्रा, वस्तु विक्रेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *