०००००
ठाणे : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची माहिती गोळा केली जाणार आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी येणार्या अधिकार्यांना जनतेने सहकार्य करावे. असे आवाहन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय मुंबईच्या उपसंचालक सुप्रिया रॉय यांनी केले.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने 1 जानेवारी 2025 पासून सुरु होणार्या घरगुती सामाजिक वापर-आरोग्य आणि संपूर्ण मॉड्यूल सर्वेक्षण टेलिकॉम या 80 व्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अनुषंगाने सीबीडी येथील पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रातील फिल्ड ऑपरेशन विभागासाठी केंद्र सरकार कार्यालयात कालपासून 26 डिसेंबरपर्यंत नमुना सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय मुंबईच्या उपसंचालक सुप्रिया रॉय यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना उपसंचालक सुप्रिया रॉय म्हणाल्या की, या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट देशाच्या विविध भागांतील रोगांचा दर, सार्वजनिकआणि खासगी आरोग्य सेवा वापरण्याचे प्रमाण, बाह्यखर्च आणि शासकीय आरोग्य विमा योजनांचा उपयोग, संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण इत्यादींबाबत माहिती संकलितकरणे आहे. संपूर्ण मॉड्यूल टेलिकॉम सर्वेक्षण संबंधित निर्देशक तसेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्यावर आधारित माहिती प्रदान करेल. संकलित केलेली माहितीचा उपयोग जागतिक निर्देशकांच्या अहवालासाठी केला जाणार आहे. यासाठी सार्वजनिक सहकार्य आवश्यक असून, सर्वेक्षणसाठी मुलाखत घेणार्या अधिकार्यांना जनतेने सुसंस्कृतपणे आणि धैर्याने योग्य उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यावेळी सुप्रिया रॉय यांनी आरोग्य संबंधित सर्वेक्षणा बद्दल माहिती दिली. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण हे देशाच्या विकासासाठी धोरणे तयार करण्यासाठी आणि संशोधनासाठी महत्वाच्या माहितीचे स्त्रोत आहे. या प्रशिक्षण शिबिरामुळे सर्वेक्षणाच्या विविध तांत्रिक बाबींबद्दल चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल. असे ही त्या यावेळी म्हणाल्या.
100 फील्ड अधिकारी उपस्थित
या सर्वेक्षण शिबीरात महाराष्ट्र राज्य शासनाच्या अर्थ सांख्यिकी आणि सांख्यिकी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य एजन्सींनी अनुसरण केलेल्या सर्वेक्षणाच्या प्रक्रियांमध्ये एकसारखेपणा राखण्यात मदत होणार आहे. या क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, मुंबई आणि ठाणे येथून सुमारे 100 फील्ड अधिकारी उपस्थित होते.
