मुंबई मुंबईत माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जगभरात नावाजलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील सफाई कंत्राटदार कामगारांना तीन तीन महिने पगार देत नसल्याने सफाई कामगारांची उपासमार होत होती. या कामगारामधील एक सफाई महिला कर्मचारी भागीरथी रंधवे हिचा उपासमारीने मृत्यू  झाला आहे. यामुळे जगभरात नावाजलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या नावाला काळीमा फासणारी घटना मुंबईत घडली आहे. अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनने एका जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या महिलेच्या पतीचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला असताना संसाराचा गाडा ओढत तीन मुलांचा भार उचलत हि महिला काम करत होती. जर कंत्राटदार तीन तीन महिने पगार देत नसेल तर आम्ही जगायचे कसे असा सवाल तिने याअगोदर अनेक वेळा कंत्राटदाराला केला होता.

 

मात्र कंत्राटदार व मुंबई पोर्ट ट्रस्ट चे अधिकारी या कंत्राटी कामगारांच्या दयनीय अवस्थेकडे गांभीर्याने पाहत नव्हते. नोकरी जाण्याच्या भीतीमुळे लेखी तक्रार करण्यास कोणी कामगार पुढे येत नाहीत. महत्वाची बाब म्हणजे कंत्राटदाराने कामगारांकडून कोणत्याही युनियनचे सभासद होणार नाही असे लिहून घेतले आहे.

वेळेत पगार न दिल्यामुळे काही कामगार कामावर येत नाहीत त्यामुळे पोर्ट प्राधिकरणाच्या  वसाहतीमध्ये अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

 

या पूर्वी देखील सफाईचे  काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तीन-तीन महिने पगार दिला जात नव्हता. मात्र युनियनने पाठपुरावा करून कामगारांना न्याय दिला होता. मात्र कंत्राटदार पुन्हा तीच वेळ कामगारांवर आणत आहे. त्यामुळे  मूळ मालक म्हणून मुंबई पोर्ट  प्राधिकरणाने  या सफाई कंत्राटी कामगारांचे पगार द्यावेत अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी पोर्ट प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे मा सचिव व प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *