कल्याण – कल्याण पूर्वेकडील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या करणाऱ्या विकृत विशाल गवळीला या गुन्ह्यात त्याची पत्नी आणि मित्रानेही साथ दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे.

विशालला शेगाव येथे पोलिसांनी बेडया ठोकल्या. या गुन्हयात साथ देणारी त्याची पत्नी साक्षी हिला देखील अटक केली आहे. आरोपीच्या घराबाहेर पडलेल्या रक्ताच्या डागांवरून त्याने मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान मंगळवारी भिवंडी नजीकच्या बापगाव परिसरात एका लहान मुलीचा मृतदेह आढळला. चौकशीत तो कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या मुलीचाच असल्याचे समोर आले. दरम्यान मुलीच्या घराच्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता एका ठिकाणी मुलगी जाताना दिसली पण पुन्हा येताना दिसली नाही. त्याठिकाणी तपास केला असता एका घराच्या परिसरात रक्ताचे डाग पडलेले असल्याने तेथे राहणा-या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल गवळीवर पोलिसांचा संशय बळावला. तो घरी आढळुन आला नाही, पोलिसांनी त्याची पत्नी साक्षीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने विशालने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या केल्याची कबुली दिली.

सोमवारी संध्याकाळी पाच वाजता रहात्या घरी विशालने त्या मुलीसोबत गैरकृत्य करून तीची हत्या केली. तिचा मृतदेह मोठया बॅगेत लपविला. सात वाजता बँकेत काम करणारी त्याची पत्नी साक्षी घरी आली असता तिला घडलेला प्रकार विशालने सांगितला. हे ऐकल्यावर तिला धक्काच बसला. दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे ठरविले. आधी घरात पडलेले रक्त पुसून टाकले आणि रात्री साडेआठला मित्राची रिक्षा बोलावून घेतली. रात्री नऊ वाजता स्वत: रिक्षा चालवित विशाल पत्नीसह मृतदेह असलेली बॅग घेऊन बापगावला गेला. त्याठिकाणी मृतदेह फेकून दोघे घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकात दारूची बाटली विकत घेतली आणि तेथूनच तो पत्नी साक्षीच्या गावी शेगाव येथे निघून गेला. तर साक्षी घरी परतली. पोलिसांनी साक्षीची चौकशी केल्यावर तिने हा सर्व उलगडा केला.

विशालला या गुन्हयात साथ देणारी साक्षी ही त्याची तिसरी पत्नी आहे. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. विशालवर यापूर्वी विनयभंग, जबरी चोरी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारीची शिक्षा देखील झाली आहे. तो जामिनावर बाहेर आला आहे. दरम्यान त्याने अल्पवयीन मुलीबरोबर केलेले कृत्य पाहता तो विकृत मनोवृतीचा असल्याचे समोर आले आहे.

विशालला दाढी होती. परंतू आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने शेगाव याठिकाणच्या सलुनमध्ये दाढी काढून टाकली. त्यानंतर तो पेहराव बदलून सलूनमधून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *