भारतीय पुरुष संघाचा श्रीलंका डेव्हलपमेंट व सिंगापूरला दणका
कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-आशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची चमकदार कामगिरी भारताला गुणतालिकेत अव्वल स्थानावर घेऊन गेली असून भारतीय पुरुष संघाने श्रीलंका डेव्हलपमेंट व सिंगापूरला दणका देत हे स्थान काबीज केले आहे. इनडोअर क्रिकेटमध्ये ८ खेळाडू मैदानात खेळतात व प्रत्येक जोडीला ४ षटके फलंदाजी करावी लागते. तर या दरम्यान बाद झालेल्या प्रत्येक खेळाडू बदल्यात संघाला ५ धावा गमवाव्या लागतात. भारतीय संघ श्रीलंकेवर विजय मिळवेल असे वाटत असताना श्रीलंकेने जोरदार मुसंडी मारत सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांनी ९९-९९ धावा केल्या व या सामन्यात दोन्ही संघांना ३.५ गुण मिळाले.
काल झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंका डेव्हलपमेंट संघाचा ५२ धावांनी पराभाव केला. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ११५ धावा केल्या तर श्रीलंका डेव्हलपमेंट संघाला भारताने १६ षटकात ६३ धावांत रोखत या सामन्यात ७ गुणांची कमाई केली. या सामन्यात भारताच्या दैविक राय व एम. मल्लिकार्जुन प्रत्येकी (१६ धावा , २ बळी), विजय गौडा (१५ धावा व २ बळी), अफरोज पाशा (२१ धावा ), धनुष भास्कर (१२ धावा व ३ बळी) तर अधिराज जोहरी (१२ धावा ) यांनी विजयात धमाकेदार कामगिरी केली.
सिंगापूर विरुध्द झालेल्या सामन्यात भारताने पहिल्या १६ षटकात सिंगापूरला १३ धावांत रोखत सहज विजयाचे ध्येय ठवले मात्र भारताने १६ षटकात १४३ धावा चोपून काढत १३० धावांनी विजय साजरा करत या सामन्यात सुध्दा ७ गुणांची कमाई करत गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे. या सामन्यात विजय गौडा (१६ धावा व ४ बळी), अफरोज पाशा (२७ धावा, २ बळी), दैविक राय( २२ धावा , १ बळी), अधिराज जोहरी (२२ धावा १ बळी) यांनी जोरदार कामगिरी केली.
भारताने आत्तापर्यंत या स्पर्धेत १७.५ गुण मिळवत निर्विवाद वर्चस्व सिध्द केले असून श्रीलंका १६.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर १३ गुणांसह इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे.