हरिभाऊ लाखे
नाशिक : दरवर्षी आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, शिष्यवृत्ती योजनेच्या लक्ष्यांक प्रमाणात लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. काही विद्यार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेत यशस्वी करिअर घडविले आहे. हे यशवंत शिष्यवृत्तीधारक आता ‘अल्युमनी कनेक्ट ‘ उपक्रमाद्वारे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करत आहेत. शिष्यवृत्तीधारक माजी विद्यार्थी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये परदेशातील शिक्षणाच्या संधी, प्रवेश प्रक्रिया तसेच शिष्यवृत्ती योजना आदींची जागरूकता वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (युएनडीपी) मदतीने ‘अल्युमनी कनेक्ट ‘ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन आयुक्त नयना गुंडे यांच्याहस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे करण्यात आले. त्यांनी शिष्यवृत्ती योजनेसह शासकीय निर्णयांमध्ये झालेले बदल, सुधारित सुविधा आदींबाबत माहिती दिली.
शिष्यवृत्तीधारक माजी विद्यार्थी तथा अटल भूजल योजना प्रकल्पाचे राज्य सल्लागार डॉ. आशिष परधी यांनी शाळेतील शिक्षणापासून ते फिनलँडमध्ये पीएच.डी. पूर्ण करण्यापर्यंतचा प्रवास मांडला. त्यांनी उच्च शिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया, प्रवेश परीक्षेची तयारी, विविध आव्हाने, याबाबत मार्गदर्शन केले. अल्युमनी कनेक्ट कार्यक्रम सहआयुक्त (शिक्षण) संतोष ठुबे, घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यावेळी शासकीय वसतिगृहातील १२० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला. आंतरराष्ट्रीय शिक्षणक्रमांची निवड प्रक्रिया, पर्यायी करिअरच्या संधी, पीएच.डी. संशोधन आदी विषयांवर प्रश्नोत्तर सत्र रंगले. सूत्रसंचालन युएनडीपीच्या अमृता भालेराव यांनी केले.
१९ वर्षांमध्ये ५६ शिष्यवृत्तीधारक
आदिवासी विकास विभागामार्फत २२०५ पासून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती दिली जात आहे. १९ वर्षांत ५६ विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठांमधील उच्च शिक्षणाच्या संधी आणि परदेशी शिष्यवृत्ती योजनेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘अल्युमनी कनेक्ट ‘ उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
कोट
परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येतात. अल्युमनी कनेक्ट कार्यक्रम हा प्रेरणा, ज्ञानवर्धन आणि सुसंवादाचे एक व्यासपीठ ठरेल. त्यातून विद्यार्थ्यांना संधी शोधण्याची तसेच शिक्षण व व्यावसायिक ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शन मिळेल. -नयना गुंडे (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *