सोमवारी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांचा संयुक्त मोर्चा

 

ठाणे : परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेले अवमानास्पद वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. 30) ठाण्यात सर्व पुरोगामी, आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळेस राजाभाऊ चव्हाण, भास्कर वाघमारे,  सुनील खांबे, सुखदेव उबाळे, आबासाहेब चासकर,  पंढरीनाथ गायकवाड,  गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमदाडे, समाधान तायडे, राहुल घोडके, लोभसिंग राठोड, विशाल ढेंगळे, बाबासाहेब येडेकर, डॉ.प्रमोद जाधव, सुरेश कांबळे, अशोक कांबळे, विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, दैवशाळा हराळे आदी शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक उपस्थित होते.
इंदिसे यांनी सांगितले की, सोमनाथ सुर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता. त्यामुळे तो कायदाबाह्य काम करण्याची शक्यताच नाही. मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून कस्टडीत डांबले आणि तिथे बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. तसा शवविच्छेदनाचा अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीने चुकीची माहिती देण्यात आली. या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांन बडतर्फ करून आयपीसी 302 तथा बीएसएस 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करून  त्यांना अटक करावी; तसेच, अमीत शहा लोकसभेत द्वेषातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक विधान केले आहे. मात्र, अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.
हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता ठाणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन करून निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पथमार्गे तलावपाळी येथे शिवरायांना मुजरा करून टेंभी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चात हजारो लोक सहभागी होतील, असेही नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *