पॅन्थर प्रकाश पगारे यांना भावपूर्ण आदरांजली
तुफानातला दिवा विझला आहे – प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे
अशोक गायकवाड
कर्जत :दलित पॅन्थर ते रिपब्लिकन चळवळ असा तीस ते पस्तीस वर्षाचा प्रवास असणारे, समूहाचे प्रश्न सोडविण्याचा लोकशाही पद्धतीने वाटचाल करणारा तुफानातला दिवा विझला आहे असे उदगार प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे यांनी शनिवार,(दि.२८ डिसेंबर) रोजी पॅन्थर प्रकाश पगारे यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त नेरळ येथे आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत काढले. अध्यक्ष -स्थानी डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल हंडोरे होते.*
प्रारंभी बौद्धाचार्य गोपाळ जाधव यांनी पुण्यानुमोदन धार्मिक विधी कार्यक्रम आटोपला. श्रद्धांजली सभेत शिवसेना ठाणे महानगरपालिका माजी नगरसेविका श्रीमती विमल भोईर म्हणाल्या की, प्रकाश पगारे हे आमचे जावई होते. जावयाच्या श्रद्धांजली सभेत सासूने बोलावे हे दुर्दैव आहे. खरं तर त्यांनी आमच्या प्रेताला खांदा द्यायला हवा होता असे भावपूर्ण उदगार श्रीमती विमल भोईर यांनी काढले.अध्यक्ष पदावरून बोलतांना राहुल हंडोरे म्हणाले की, एक लेखक, कवी, कामगार नेता आणि परखड वक्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. सुरवातीच्या पॅन्थर चळवळीत प्रकाश पगारे हा आपल्याला आर्थिक मदत करत असे असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे एका जाहीर कार्यक्रमात केले होते यांची आठवण हंडोरे यांनी या प्रसंगी केली. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील विद्यापीठ गेट समोरील लावलेल्या स्मारक फलकावर प्रकाश पगारे यांचे नाव आहे. शेवटी शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज राजे फतेसिंग भोसले यांनी दलित पॅन्थर संघटनेत त्याची राज्य कार्यकारणीवर निवड केली होती असे ही हंडोरे म्हणाले. श्रद्धांजली सभेचे प्रास्तविक भारतीय बौध्द महासभेचे तुळजापूरचे अध्यक्ष देविदास कदम यांनी केले. तसेच समाजसेवक अन्सारा खोत, किशोर उबाळे आदिची आदरांजली पर भाषणे झाली.
