न्युयॉर्क : बुद्धिबळातील भारताची जागतिक वर्चस्व आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. क्लासिक बुद्धिबळात भारताच्या गुकेशने पुरुष विभागात नुकतेच जगज्जेतेपद पटकावले होते. त्यापाठोपाठ आज वर्षाचा शेवट गोड करताना भाराताची महीला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने जलद बुद्धिबळाचे जगज्जेतेपद पटकावले.
३७ वर्षीय हम्पीने रविवारी इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याआधी तीने २०१९ मध्ये जॉर्जियामध्ये ही स्पर्धा जिंकली होती. याशिवाय हंपीने अनेक विक्रम केले आहेत. हम्पी आता हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी चीनच्या जू वेनजुननंतर दुसरी खेळाडू ठरली आहे. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू आहे.
हम्पीने एकूण 11 पैकी 8.5 गुण मिळवले आणि यासह विजेतेपद पटकावले. आज तिचा शेवटचा सामना अनिर्णित राहिला असता किंवा ती हरली असती तर विजेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले असते. अशा स्थितीत हम्पीने दमदार खेळ दाखवत सामना आणि विजेतेपद पटकावले. गुकेशनेही अशाच परिस्थितीत शेवटचा सामना जिंकत जगज्जेतेपद पटकावले होते. त्याने गतविजेता आणि चिनी बुद्धिबळ मास्टर डिंग लिरेनचा पराभव केला होता. हे विजेतेपद पटकावून गुकेश विश्वनाथन आनंदनंतर जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनणारा दुसरा भारतीय ठरला.
