मुंबई : महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक आणि साताऱ्यातील जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे.
साताऱ्यात अजित पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तर दुसरीकडे आजच भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेत उदयनराजेंच्या नावाची घोषणा करतील असेही बोलले जात आहे. मात्र, अशातच प्रफुल्ल पटेलांच्या मागणीमुळे महायुतीमध्ये आता नवा ट्विस्ट आल्याचे चित्र आहे.
साताऱ्यामध्ये पूर्वापार राष्ट्रवादीचा बोलबाला राहिला असून हा आमचा गड आहे. 1999 साली पक्षाच्या निर्मितीपासून येथे राष्ट्रवादीला मोठे यशही आले आहे. काहीकाळ अजित पवारांनीही तेथील पालकमंत्री म्हणून काम केले असल्याने त्यांनाही मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे. त्यामुळे येथे तळागाळात राष्ट्रवादीला कौल दिला जाईल. त्यामुळे आम्हाला ती जागा मिळावी ही मागणी अगदी स्वाभाविक असल्याचे मत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी बोलताना व्यक्त केलय. मात्र, या जागेसंदर्भात अंतिम निर्णय महायुतीतील पक्षश्रेष्ठी चर्चा करून ठरवतील असेही ते म्हणाले.
नाशिक लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत नवा सामना रंगला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. महायुतीत नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे मात्र त्यांनी एक जागा सोडली तर बरं होईल असे वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व जागा सोडण्याचे मान्य केले आहे का, असा सवाल शिवसेना गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी उपस्थित केला आहे. नाशिकच्या जागेवरून प्रफुल्ल पटेल म्हणाले की, नाशिकमध्ये विद्यमान खासदार हे शिवसेनेचा आहे.
त्यामुळे जागावाटपात आतापर्यंतच्या विद्यमान खासदारांच्या जागेबाबत एखादा जागेवर थोडी तडजोड केली आणि एखाद-दुसरा खासदार कमी झाला तर त्यांनी ते मान्य केलं पाहिजे आणि भाजपनेही ते मान्य केल्यास आम्हाला बरं वाटेल, असं वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. त्यामुळे नाशिकची जागा नक्कीच आम्ही मागत असून त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षांतर्गत विषय आहे. तसेच त्याबद्दल नंतर ठरवल्या जाईल, सर्वप्रथम ही जागा आम्हाला सुटली पाहिजे अशी मागणीही प्रफुल्ल पटेल यांनी केलीय.
