गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोलीतील विविध उपक्रमात व्यस्त होते. फडणवीस यांच्या उपस्थितीत कोट्यावधीचे इनाम असलेल्या कमांडकर तारक्कासह ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
यावेळी फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत सी-60 जवानांचा सत्कार सोहळा आणि माओवाद्यांचा आत्मसमर्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस गडचिरोलीत उपस्थित आहे
स्वतंत्र भारताच्या इतिहासात अहेरी ते गरदेवाडा बस पहिल्यांदा धावत आहे. त्या बसचं उद्घाटन आपण केलं. पेनगुंडाला नवीन आऊटपोस्ट सुरु केलं. कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं, यामुळं गडचिरोलीला स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यात माओवाद हा जवळजवळ संपुष्टात आणण्याचं काम सुरु केलं आहे, याचा आनंद आहे. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली आहे. दक्षिण गडचिरोली माओवादापासून मुक्त होईल याबाबत मनात शंका नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज जे काही विविध उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून , जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरु झाले त्याचा परिणाम असा आहे, गेल्या चार पाच वर्षात आपल्या गडचिरोलीतून एकही युवक किंवा युवती माओवादी संघटनेत सामील झाली नाही. महाराष्ट्रात माओवाद्यांचं रिक्रुटमेंट पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. हे जे कार्य पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन करु शकलं हे अत्यंत मोलाचं आहे. जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर, राज्यावर, देशावर आणि संविधानावर वाढतो आहे. त्यामुळं कोणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे बघायला मिळतंय, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माओवाद हा कोणताही विचार नाही,कुठलाही आचार नाही, भारताच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या लोकांनी अराजकता तयार करण्याकरता हे अभियान उभारलं, सुरुवातीच्या काळात काही लोकं भरकटले. आज जे लोकं या माओवादी गतिविधी आहेत त्यांच्या लक्षात येत आहे, न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतून मिळेल, भारतीय संविधानानं तयार केलेल्या संस्थातून मिळेल. विकास पुढं चाललाय तशी माओवादाची पिछेहाट होताना पाहायला मिळेल. सी-60 आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या शौर्यामुळं येत्या काळात माओवाद महाराष्ट्रातून हद्दपार झालेला असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस म्हणाले.