हंगामास सुरुवात, राज्यात 37 हजार 732 शेतकऱ्यांकडून निर्यातीसाठी नोंद
हरिभाऊ लाखे
नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. युनायटेड अरब, रशिया, सौदी अरेबिया, मलेशिया, सिंगापूर, ओमान या देशामध्ये 312 कंटेनरमधून 4763 टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, निर्यातीचे कंटेनर रवाना झाला आहे.
याबाबत द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी माहिती दिली की, यंदा या द्राक्ष पिकाला अवकाळी व थंडीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला आहे. युरोपीय देश वगळता गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनर या द्राक्षांच्या हंगामात कमी निर्यात झाली आहे. यंदा महाराष्ट्रामधून 37 हजार 732 शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंद केली असून, मार्च 2025 पर्यंत मुदत असल्याने यात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त द्राक्ष निर्यातीसाठी द्राक्षांची नोंद करावी आणि ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार औषधांची फवारणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे करण्यात आले आहे.
द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन 2023-2024 हंगामात तब्बल 3 लाख 43 हजार 982 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून 3460 कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले.
नाशिकच्या द्राक्षांना जागतिक बाजारात स्थान
गुणवत्ता वाढली तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ व करकरीत द्राक्षांनी गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले आहे.
0000