रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय या प्रशालेचा शतक महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री मान. श्रीपादजी नाईक यांच्या उपस्थित पार पडला. भविष्यात गुणवत्ताधिष्टित शिक्षणासाठी शिक्षण पद्धतीत बदल केले जात आहेत. आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ताधिष्टित शिक्षण मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सर्वसामावेशक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन नाईक यांनी यावेळी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी व कै. मालतीबाई जोशी यांचे नातू डॉ. मुकुंदजी जोशी, गिरीश जोशीं, नात माधुरी लोकापुरे, ज्यांच्या देणगीतून ही शाळा उभारली गेली त्या गोदुताई जांभेकर यांचे नातू विजय जांभेकर, नातसून नीता जांभेकर आणि पणती प्रज्ञा जांभेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. विलासजी पाटणे आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी आपल्या मनोगत ‘माणसाला काम नाही आणि कामाला माणूस नाही अशा प्रकारच्या शिक्षणापेक्षा गरजाधिष्टित शिक्षण देण्याचा संकल्प’ असल्याचे सांगितले. संस्थेच्या घटक संस्थेत तंत्रस्नेही शिक्षण तसेच आयबीटी सारखे शिक्षण देणारे कोर्सेस चालू केले जातील तरच समाजातील विषमता दूर होईल असे त्यांनी सागितले.
शतक महोत्सवी सोहळ्याची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. नंतर दीपप्रज्वलन करून तसेच संस्थापक कै. बाबुराव जोशी, मालतीबाई जोशी तसेच भूतपूर्व कार्याध्यक्ष कै. अरुआप्पा जोशी व देणगीदार सौ. गोदूताई जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष राजन मलुष्टे यांनी केले. यावेळी प्रशालेच्या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. विजयजी साखळकर, सर्व नियमक मंडळ सदस्य, संस्था पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
शतक महोत्सवी सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रशालेच्या इंग्रजी शिक्षिका संजना तारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिक, हितचिंतक व शंभर वर्षातील माजी विद्यार्थी बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी
रत्नागिरीयेथील गोदूताई जांभेकर शाळेच्या शतकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त गोदुताई जांभेकर यांच्या कुटुंबियांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे सहकार्यवाह श्रीकांत दुग्गीकर यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारताना गोदुताईंची पणती प्रज्ञा जांभेकर आणि नातसून नीता जांभेकर.
00000
