प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‌‘विंदांचे गद्यरूप‌’ या समीक्षात्मक ग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एका ज्ञानपीठ विजेच्या कवीवर लिहिलेल्या समीक्षणात्मक ग्रंथाला पुरस्कार मिळावा, यासारखा दुसरा चांगला योगायोग नाही. कोकणी साहित्यातील योगदानाबद्दल मुकेश थळी यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. दोघांच्या सन्मानाने मराठी आणि कोकणी भाषेच्या शिरात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विचक्षण लेखक आणि वाचनमग्न समीक्षक म्हणून साहित्यक्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा असलेले डॉ. सुधीर रसाळ वयाच्या 91 व्या वर्षीदेखील त्याच उत्साहाने साहित्य सेवा करत आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून ख्यातकीर्त आहेत. शतकी वाटचालीकडे निघालेल्या रसाळ सरांच्या ‌‘नव्या वाटा शोधणारे कवी‌’ या सोळाव्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. त्यांनी संपादित केलेली तीन पुस्तकेदेखील प्रकाशित आहेत. त्यांना आतापर्यंत 28 नामवंत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‌‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीज कॉलेज‌’चे अर्थात मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या फळीचे ते विद्यार्थी होते. अध्ययनानंतर छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात तीन वर्षे अधिव्याख्यातापदावर त्यांनी अध्यापनकार्य केले. 1959 मध्ये मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग सुरू झाला, तेव्हा पहिल्याच वर्षी सुप्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी व डॉ. यु. म. पठाण यांच्यासमवेत त्या विभागात रसाळ हे अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले.त्यानंतर निवृत्त होईपर्यंत ऑगस्ट 1994 पर्यंत याच विभागात अधिव्याख्याता- प्रपाठक- प्राध्यापक अशा पदांवर ते 34 वर्षे ते कार्यरत होते.
रसाळसरांनी वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‌‘काव्यातील प्रतिमासृष्टी: मराठी काव्याच्या संदर्भात‌’ या विषयावर पीएच.डी.साठी संशोधन केले. या पीएच.डी.प्राप्त प्रबंधाचे संस्कारित रूप म्हणजे ‌‘कविता आणि प्रतिमा‌’ हा गाजलेला काव्यविषयक मीमांसा-ग्रंथ. जून 1982 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला. ‌‘प्रतिमा‌’ ही संकल्पना आणि तिचे काव्यातील महत्त्व व कार्य यांची सांगोपांग मांडणी करणारा असा दुसरा ग्रंथ मराठीत नाही. भारतीय आणि पाश्चात्त्य मतांतरांचा परामर्श घेत, अनेक गुंतागुंतींची उकल करत, कठीण विषय सुगम पद्धतीने समजावून सांगण्याची रसाळ यांची समीक्षाशैली या ग्रंथरूपाने आदर्श म्हणून स्थापित झाली. याशिवाय त्यांचे ‌‘काही मराठी कवी: जाणिवा आणि शैली‌’ (1984) हे काव्यसमीक्षेचे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रमुख संपादित ग्रंथांमध्ये ‌‘साहित्य: अध्यापन आणि प्रकार‌’ (वा.ल. कुलकर्णी गौरव ग्रंथ, सहकार्याने संपादन, 1987), ‌‘गंगाधर गाडगीळ: निवडक समीक्षा‌’ (1996), ‌‘दासोपंत: गीतार्णव‌’ (मराठवाडा विद्यापीठ) याशिवाय जवळ जवळ दीडशेवर समीक्षालेख विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून आणि काही संपादित ग्रंथांमधून प्रसिद्ध आहेत. बहुतेक प्रमुख आणि गाजलेल्या चर्चासत्रांमधून त्यांनी महत्त्वपूर्ण वाङ्मयीन विषयांवर निबंधलेखन केले आहे. विविध ललित साहित्यकृतींच्या समीक्षणांप्रमाणेच मराठी भाषेची सद्यस्थिती, मराठी साहित्याचे अध्यापन, वाचनसंस्कृती, मराठीच्या पीछेहाटीची कारणमीमांसा इत्यादी विषयांवर त्यांनी महाराष्ट्रभरातील विविध व्यासपीठांवरून मौलिक चिंतन मांडले आहे. डॉ. रसाळ यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करताना साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे.
91 वर्षीय सुधीर रसाळ म्हणजे मराठीतील अग्रगण्य समीक्षक. हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडवणारे मराठी भाषेचे शिक्षक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून त्यांची प्रदीर्घ कारकीर्द संस्मरणीय आहे. ते अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषद, विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य अकादमी अशा विविध संस्थांवर त्यांनी काम केले. त्यांचा ‌‘कविता आणि प्रतिमा‌’ हा काव्यविषयक मीमांसा ग्रंथ गाजला. राज्य शासनाचा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मराठीमध्ये वाड्मयाच्या सैध्दांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाड्मयविषयक सर्व जटिल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणाऱ्या आणि वाड्मयकृतीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या मूल्यमापनासंबंधीचे योग्य निकष देणाऱ्या भूमिकेचा नव्याने शोध घ्यावा, ही प्रेरणा मराठी समीक्षेत दिसून येत नाही. दीडशे वर्षांच्या मराठी समीक्षेच्या इतिहासात असे दोनच प्रयत्न झाले. बा. सी. मर्ढेकरांनी सर्व ललित कलांच्या आंतररचनेसंबंधीचा आपला लयसिद्धांत मांडला. त्यानंतर लगेचच विंदा करंदीकरांनी सर्व ललित कलांमधून वाड्मयकला बाजूला काढणारा आणि वाड्मयकलेचे वेगळे स्वरूप अधोरेखित करणारा जीवनवेधी कलेचा सिद्धांत मांडला.
मराठीत मर्ढेकरांच्या लयसिद्धांताची घेतली गेली तशी दखल करंदीकरांच्या जीवनवेधी कलेच्या सिध्दांताची घेतली गेली नाही. किंबहुना, त्यांच्या वाड्मयविषयक सैद्धांतिक भूमिकेची उपेक्षाच झाली. खरे म्हणजे करंदीकर यांनी केवळ जीवनवेधी कलेचा सिद्धांत मांडला नाही, तर हा सिद्धांत केंद्रस्थानी ठेवून समग्र काव्यशास्त्रच उभे केले. शिकवण्यासोबत रसाळ सर रमले ते समीक्षा आणि साहित्य संस्थात्मक कामात. मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय महामंडळ, साहित्य संमेलनात ते वावरले. अनंतराव भालेराव, भगवंतराव देशमुख, पाध्ये, नानासाहेब चपळगावकर यांच्यात ते रमले. मराठी साहित्य प्रांतीचा 1960 नंतरच्या पडद्याआडही घडलेल्या घटनांचा बिनचूक संदर्भ म्हणजे सुधीर रसाळ सर. नव्वदीतही ते व्यासंगमग्न आहेत. सकाळी साडेआठ ते साडेबारा, दुपारी दोन ते साडेचार आणि संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ ही त्यांची साधारणपणे दररोजची लेखनाची वेळ असते. लेखन म्हणजे टाईप करणे. रसाळ सर संगणकावर लेखन करण्याची कला वयाच्या साठीत शिकले. त्यांची कॉपी एकदम नेटकी. मुद्रणासाठी अंतिम कॉपी कशी बिनचूक असावी, याचा आदर्श म्हणजे रसाळ सरांची कॉपी. लेखनासोबत वाचनही सुरू असतेच. ते अतिशय परखड. आपल्या बोलण्याने, समीक्षेने कुणी दुखावले जाते, म्हणून बोलायचेच नाही, समीक्षा करायचीच नाही का, असे ते थेट विचारतात.
डोंबिवलीतील एकदिवसीय साहित्य संमेलनामध्ये त्यांनी केलेले भाषण असेच लक्षवेधी आणि मर्मभेदी होते. समीक्षा या प्रकाराकडे लक्ष दिले जात नाही. साहित्याच्या झाडावर बांडगूळ उगवते, त्या दृष्टीने लेखक समीक्षकाकडे पाहतात. मराठी साहित्य वाचले जात नसल्याने साहित्याची समीक्षा कोण वाचणार, असा प्रश्न आहे. मराठी साहित्यात समीक्षकांची वानवा आहे. मराठी साहित्याची समीक्षा ही पाश्चात्यांच्या समीक्षेवर अवलंबून राहिली आहे. आपल्या समीक्षकांनी ती परंपरेशी जोडून घेऊन केलेली नाही. मध्ययुगीन समीक्षक नवे लिहिणाऱ्याचे काही वाचत नाहीत. नवे लिहिणारे मध्ययुगीन साहित्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या साहित्याची समीक्षा योग्य प्रकारे झालेली नाही, असे मत व्यक्त करताना आपल्याकडे दीडशे वर्षांच्या कार्यकाळात मराठीतील एकही ग्रंथ अन्य भाषेत भाषांतरीत झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
साहित्य अकादमीचे अन्य एक पुरस्कारार्थी मुकेश थळी यांनी पणजी आकाशवाणी केंद्रावरून वृत्तनिवेदक म्हणून 30 वर्षे सेवा दिली आहे. गेल्या वर्षी ते निवृत्त झाले. कोकणी, मराठी, इंग्रजी भाषेत ते सातत्याने स्तंभलेखन करतात. त्यांचे ‌‘वळेसर‌’, ‌‘हंसध्वनी‌’, ‌‘अक्षरब्रह्म‌’, ‌‘जीवनगंध‌’, ‌‘रंगतरंग‌’ हे निबंधसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‌‘दोरेमीफा‌’, ‌‘सारेनीसा‌’ या पुस्तकांना कला अकादमी कोकणी नाट्य स्पर्धेत लेखनाचे पहिले बक्षीस मिळाले होते. ते कोकणी-इंग्रजी शब्दकोशाचे सहरचनाकार असून गोवा विद्यापीठाच्या कोकणी विश्वकोश विभागात संशोधन साहाय्यक म्हणून सहा वर्षे सेवा दिली आहे. त्यांनी कथा, कविता, एकांकिका, असंख्य गीत आणि नाटकांचे लेखन केले आहे. सूत्रसंचालक आणि मुलाखतकार म्हणून त्यांची खास ओळख आहे. साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात थळी यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे. ‌‘रंगतरंग‌’ या पुस्तकात 20 ललित निबंध आहेत.
श्री. थळी हे बहुभाषी साहित्यिक, अनुवादक आहेत. त्यांना गणित आणि शास्त्रीय संगीत या विषयांमध्ये रूची आहे. ते गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये शालेय स्तरावर गणिताचे अध्यापन करत. गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विश्वकोश विभागात संशोधन सहाय्यक, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांचे कोकणी भाषेत चार ललित लेखसंग्रह आणि एक नाटक प्रकाशित आहे. कोकणी-इंग्रजी शब्दकोशासाठी सहसंपादक, कोकणी कथांचे इंग्रजी अनुवाद जे साहित्य अकादमी आणि फ्रंटलाईन अशा राष्ट्रीय स्तरावरच्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. कथा, कविता, गीते आणि नाटकांचे लेखन तसेच कोकणी, इंग्रजी, मराठी नियतकालिकांसाठी स्तंभलेखक, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून काम केले आहे. थळी यांना त्यांच्या ‌‘रंगतरंग‌’ या कोकणी पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर होणे हा महत्वाचा सन्मान आहे.
( अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *