मुंबई : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी तयार केली जाते. मात्र ही यादी तयार करण्याआधी इमारतींचे संरचनात्मक सर्वेक्षण होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता सर्वच जुन्या इमारतींचे टप्प्याटप्प्याने संरचनात्मक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या यादीनुसारच यापुढे धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, गृहनिर्माण विभागाने शंभर दिवसांचा कार्यक्रम सादर केला आहे. यामध्ये या बाबीला प्राधान्य देण्यात आले आहे. सुरुवातील सुमारे ५०० इमारतींचे संरचनात्मक सर्वेक्षण केले जाणार आहे. या यादीमुळे तात्काळ पाडून टाकण्यायोग्य वा दुरुस्ती करणे शक्य असल्याची यादी सहज उपलब्ध होऊ शकेल. दरवेळी पावसाळ्यात होणारी इमारत दुर्घटनाही त्यामुळे टळली जाईल, असा विश्वास गृहनिर्माण विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.
याशिवाय धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाकडून जो निधी मागितला जातो, त्याचे समर्थन करणेही सोपे होणार आहे. निधीसाठी गृहनिर्माण विभागाकडून ज्यावेळी वित्त विभागाकडे मागणी केली जाते, तेव्हा नगरविकास विभागाकडे इमारतीनिहाय माहिती मागितली जाते. त्यात संरचनात्मक सर्वेक्षणाचीही विचारणा केली जाते. त्यामुळे आता या जुन्या इमारतींच्या संरचनात्मक सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार इमारतींची वर्गवारी तयार केली जाणार आहे. त्यानुसार एखादी इमारत किती धोकादायक आहे, याचा आढावा घेणे सोपे होणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
पुनर्विकास करण्याच्या नावाखाली एखादी चांगली इमारत धोकादायक घोषित करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढीस लागले आहेत. म्हाडाच्या इमारतीही त्यास अपवाद नाहीत. जुन्या उपकरप्राप्त इमारतींबाबत हा प्रकार बऱ्याच वेळा घडतो. मात्र आता म्हाडामार्फतच जुन्या इमारतीचे संरचनात्मक सर्वेक्षण करुन इमारतीच्या नेमक्या अवस्थेचा अहवाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही यादी म्हाडाकडून वेळोवेळी अद्ययावत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *