ठाणे विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्यावतीने
ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्यावतीने स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत आज मो.ह विद्यालय, ठाणे येथे मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. सर्व शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावे. मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे, असे आवाहन स्वीप पथक यांनी केले.
स्वीप आराखड्यानुसार मतदार नोंदणी व त्यांचा सहभाग वाढविण्यासांठी प्रचार, प्रसिद्धी, जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत शालेय व्यवस्थापन समिती मार्फत चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी स्वीप कार्यक्रम राबविण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदान जनजागृती’ विषयावर स्पर्धा घ्या प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मतदान जनजागृती’ या विषयांवरती माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आणि जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात सामूहिक पणे दिल्या.
सदर कार्यक्रमात मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी मतदान करणारंच…, आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा, या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक 20 मे 2024 असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.
मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
