अनिल ठाणेकर
ठाणे : स्मार्ट मीटरसारखी अनेक धोरणं ही, सरकारपुरस्कृत रक्तपिपासू शोषक-व्यवस्था होय, असा जोरदार हल्लाबोल धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी राज्य शासनावर केला.
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गत सरकारच्या काळात उर्जामंत्री असताना, त्यांनी तत्कालीन पावसाळी अधिवेशनात, (३ जुलै-२०२४ रोजी) महाराष्ट्रीय जनतेला आश्वासन देताना, “सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्यात येणार नाही” अशी घोषणा केली होती. मात्र, विधानसभेत दिलेल्या आपल्याच आश्वासनाचे उल्लंघन करीत, ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला फॉल्टीमीटर व नवीन वीज पुरवठ्याकरीता, स्मार्ट मीटर बसविण्यास अदानी कंपनीने सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्य जनतेची ही फसवणूक अदानीच्या माध्यमातून सरकारने सुरु केलेली असून, या विरोधात ठाणे शहरातील राजकीय पक्ष, समविचारी संस्था व कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे जिल्हा स्मार्ट प्रीपेड वीज मीटरविरोधी समिती’ची स्थापन करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने, लाखो वीज ग्राहकांवर लादण्यात येणाऱ्या, स्मार्ट प्रीपेड मीटरच्या दुष्परिणामांबाबत, जनजागृती करण्याच्या उद्देशाने, ७ जानेवारी-२०२५ रोजी, महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट येथील प्रशासकीय कार्यालयात एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महावितरणच्या कामगारांना संबोधित करताना मा. राजन राजे म्हाणाले की, “स्मार्ट मीटर आणि त्यामाध्यमातून जी काही धोरणं लादण्यात येत आहेत, त्याची पहिली कुऱ्हाड ही, कंत्राटी कामगारांवर पडणार आहे. आज या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रक्तपिपासू शोषक-व्यवस्था (Vampire State System) लादण्यात येत आहे. गेली ३० ते ४० वर्षे महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात याच कंत्राटी कामगार पद्धतीविरोधात मी धर्मयुद्ध पुकारलंय आणि म्हणूनच माझ्या पक्षाचं नावदेखील ‘धर्मराज्य पक्ष’ ठेवलंय. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, ही जी संपूर्ण भांडवली व्यवस्था आहे, तिला मी म्हणूनच सरकारपुरस्कृत रक्तपिपासू शोषक-व्यवस्था म्हणत आलोय. एकीकडे सरकार, व्यवस्थापकीय पद्धत, उत्पादन, संदेशांची देवाण घेवाण आणि संगणकीकरणासह, इतरही क्षेत्रात स्मार्ट बनलं आहे.पण, आमचे पगार स्मार्ट कधी होणार? स्मार्ट मीटर लावण्याआधी आमचे पगारदेखील स्मार्ट करा!” असा जोरदार घणाघात आपल्या तडाखेबंद भाषणात केला. दरम्यान, मोदी-शहा आणि अदानी-अंबानी नव्हे; तर, आम्ही यादेशाचे मालक आहोत. जनता व कामगार यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन करुन, तरुणपण संघर्षात गुंतवलं नाही; तर, म्हातारपणी तुम्हाला गुलामगिरीचा सामना करावा लागेल असा इशारा देत, मा. राजन राजे यांनी, ‘ईव्हीएम’ सुरु राहिले तर, तुम्ही-आम्ही संपलो असं समजा. कारण, साताधाऱ्यांना तुमच्या जनमताची गरज नाहीये. म्हणूनच, २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातील, कार्यालयांतील लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’चा निषेध नोंदविण्याचे आवाहन राजन राजे यांनी यावेळी उपस्थित कामगारांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *