पर्यटकांसह पालकांची मागणी
माथेरान : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरान मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकूण २० ई रिक्षा सुरू आहेत. सहा महिन्यांचा हा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर मध्ये पूर्ण झाला असून उर्वरित ७४ ई रिक्षा सुध्दा लवकरच सुरू व्हाव्यात यासाठी श्रमिक हातरीक्षा चालक मालक संस्थेच्या सदस्यांनी १४ जानेवारी पासुन ई रिक्षा बंद ठेऊन बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.त्याबाबतचे लेखी पत्र या संस्थेच्या सदस्यांनी कार्यक्षम मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांना सादर केले आहे.
ही सेवा बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समजल्यावर पालक वर्गासह नागरिकांमध्ये नाराजीचे सावट पसरले असून यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. फिरावयास येणाऱ्या जेष्ठ पर्यटकांना सुध्दा याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. नियमितपणे कॉलेजला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुध्दा या बंदची झळ सोसावी लागणार आहे त्यासाठी या ई रिक्षांची सेवा बंद न करता शालेय विद्यार्थी,रुग्ण आणि आपत्कालीन व्यवस्था म्हणून सुरू ठेवाव्यात. याच ई रिक्षा सुरू होण्यासाठी शालेय विद्यार्थी सुध्दा त्यावेळी रस्त्यावर उतरले होते. तर ई रिक्षांच्या समर्थकांनी सुध्दा यासाठी आपले भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे उर्वरीत ७४ हातरीक्षा चालकांना या ई रिक्षा मिळाव्यात ही त्यांची मागणी जरी योग्य असली तरी सुद्धा शालेय विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना वेठीस धरू नका त्यांना नियमितपणे ही सेवा उपलब्ध करून द्यावी. ह्या ७४ हातरीक्षा चालक मालकांनी बिनधास्तपणे उपोषणाचे हत्यार हाती घ्यावे.सर्व ९४ ई रिक्षा सुरू झाल्यास पर्यटनाला चालना मिळणार असून सर्वानाच व्यवसाय उत्तम प्रकारे प्राप्त होणार आहे. उपोषणाला आम्हा सर्वच ई रिक्षा समर्थक आणि ग्रामस्थांचा जाहीर पाठींबा असणार आहे. परंतु ही सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर पहावयास मिळत आहे.