ठाणे : श्री अंबिका योग कुटीर आणि श्री आनंद भारती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी सकाळच्या सत्रात श्री आनंद भारती समाज सभागृहात गेली साडे तीन दशके त्रैमासिक विनामूल्य योगाभ्यासाचे वर्गाचे आयोजन केले जाते. या अभ्यासात हवा एक प्राणवायू आहे, त्याचे महत्त्व अन्न आणि पाण्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्रैमासिक वर्ग पूर्ण केल्यानंतर योगाभ्यासात सातत्य राखण्यासाठी साधकांनी पुढील वर्गातही सहभागी व्हायला पाहिजे असा सल्ला जेष्ठ योगगुरू शेखर पेटकर यांनी दिला.
योगाभ्यासच्या ५८ व्या वर्गाचा समारोप तर ५९ व्या वर्गाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना गुरु शेखर पेटकर बोलत होते. याप्रसंगी श्री आनंद भारती समाजाचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर, कार्याध्यक्ष ओमप्रकाश धीरोलिया, योग विभाग प्रमुख सचिन काटकर, माजी कार्याध्यक्ष महेश कोळी, जेष्ठ सदस्य प्रल्हाद नाखवा यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कोळी यांनी केले. या त्रैमासिक वर्गात ३५ पुरुष आणि १५ महिला सहभागी झाल्या होत्या. या प्रशिक्षणार्थींना योगेश पाचपांडे, प्रवीण धुरी, रमेश कोळी, मिनाक्षी कोळी, मनोज पटेल, शरद पाटील व ऋषिकेश माळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. या त्रैमासिक वर्गातील शिवांगी राणे, मिना कोळी, दिपाली पाटील, राजश्री सोनावणे, कांचन कोळी, मोहन चव्हाण, विजय आपटे आणि सलील कोळी यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्यात आले.