जानेवारी महिना उजाडला की सर्वांना वेध लागतात ते मकर संक्रांत या सणाचे. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण मानला जातो. मकर संक्रांतीनिमित्त पंतगोत्सव साजरा करण्याची आपल्याकडे खूप जुनी परंपरा आहे. रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवून हा उत्सव साजरा केला जातो. लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वचजण पतंग उडविण्याचा आनंद यानिमित्ताने लुटत असतात पण अलीकडे हा खेळ जीवघेणा ठरत आहे. पतंग उडविण्यासाठी पूर्वी साधा सुती दोरा वापरला जात होता मात्र काही वर्षांपासून पतंग उडविण्यासाठी चिनी किंवा नायलॉन मांजाचा वापर केला जातो आणि हाच नायलॉन मांजा आता जीवघेणा ठरत आहे. मागील आठवड्यात पुण्यातील वारजे, धनकवडी आणि कात्रज – कोंडवा परिसरात दुचाकी वरून जाणाऱ्या व्यक्तींच्या गळ्याला नायलॉन मांजा कापल्याने दुखापत झाल्याची घटना घडल्या. केवळ नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांचा जीव वाचला अर्थात सर्वांचेच नशीब बलवत्तर असते असे नाही. मागील वर्षी दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजाने गळा चिरून पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली होती. अर्थात नायलॉन मांजाने गळा चिरून निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाल्याची टी पहिलीच बातमी नव्हती दरवर्षी अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. दौंडमध्येही दोन वर्षी अशाच प्रकारे एका दुचाकी स्वाराचा बळी गेला होता. तीन वर्षापूर्वी पुण्यात एका तरुणीला ही अशाच प्रकारे दुर्दैवी मृत्यू आला होता. केवळ पुण्यात नाही तर नाशिकमध्येही अशीच घटना घडली होती त्यातही एका महिलेचा नायलॉन मांजाने गळा चिरून दुर्दैवी मृत्यू झाला होता. अर्थात हे प्रातिनिधिक उदाहरणे आहेत अशाप्रकारे नायलॉन माजांने राज्यात अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. या मांजामध्ये अडकून आकाशात मुक्तविहार करणारे पक्षीही जखमी होतात काही पक्षी मृत्यू पावतात. चिनी बनावटीचा हा मांजा नायलॉन धागा, काचेचा चुरा, लोखंडाचे कण आणि रासायनिक पदार्थांपासून बनवला जातो. हा मांजा माणसांसोबत पक्षी आणि प्राण्यांसाठी देखील घातक आहे. वास्तविक नायलॉन मांजाचा खरेदी विक्रीवर बंदी घालण्याचे आणि वापराबाबत प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. मांजामुळे पशूपक्षांना होणाऱ्या दुखापतीच्या संदर्भात पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवले होते. नायलॉन मांजामुळे वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२ च्या अनुसूचितील वन्यप्राणी व पक्षांचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यास वन कायद्याच्या कलम ९ नुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यामुळे नायलॉन मांजाच्या विक्रीवर महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेली असतानाही हा मांजा दुकानात सर्रास विकला जात आहे तरीही विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसत नाही. काही ठिकाणी प्रशासनाने कारवाई केल्याच्या बातम्या आल्या ही समाधनाची बाब असली तरी कारवाईत सातत्य नाही. जो मांजा दुकानात विकण्यासाठी येतो तोच मांजा प्रशासनाला कसा मिळत नाही? आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे ? प्रशासनाने नायलॉन मांजा विरोधात धडक मोहीम राबवायला हवी. नायलॉन मांजा विकणारा आणि खरेदी करणारा अशा दोघांवरही कारवाई व्हायला हवी. नागरिकांनीही नायलॉन मांजाने पतंग उडविण्याऐवजी साध्या सुती दोरीचा वापर करून पतंग उडवावी आणि हा सण साजरा करावा.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *