नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या हद्दीतील चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या नागरिकांच्या 50 मोबाईल फोनचा शोध घेऊन त्यापैकी 28 नागरिकांना परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते परत केले.

यावेळी हरवलेले व चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.

परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

सदर पथकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींची दखल घेऊन तांत्रिक तपास करुन भारतातील विविध राज्यातून एकुण 50 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यापैकी सोमवारी पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते 28 नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले. उर्वरीत मोबाईल फोनच्या तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना देखील त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *