नवी मुंबई : स्वच्छतेइतकेच पर्यावरणाकडे लक्ष देत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमांना सुरूवात करण्यात आलेली आहे. या अंतर्गत वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते असे शहरातील मुख्य रस्ते, त्यांच्या शेजारचे पदपथ व मधील दुभाजक यांची बारकाईने सफाई करण्याकडे लक्ष दिले जात आहे. ज्या माध्यमातून रस्ते, पदपथ यांच्या कडेला साचणारी माती, कचरा यांची सफाई होईल व वायू प्रदूषणात घट होईल. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार 30 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविल्या जात असल्याने याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
या मोहीमांचे 13 जानेवारीपर्यंत नियोजन करण्यात आले असून कोणत्या दिवशी, कोणता रस्ता किंवा कोणत्या परिसराची सखोल साफसफाई करावयाची आहे, त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्या वेळापत्रकानुसार अगदी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही मोहीमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त संतोष वारुळे तसेच परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून संबंधित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचारीवृंद व स्वच्छताकर्मी यांच्या सहयोगाने या सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहे.
या अनुषंगाने आज 9 जानेवारी रोजी बेलापूर विभागात कोकण भवन ते हायवे ब्रीज पर्यंत व टाटानगर परिसर रस्त्यांची सखोल स्वच्छता सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांच्या वतीने करण्यात आली.
कोपरखैरणे विभागात कोपरखैरणे गाव, गावठाण, विस्तारित गावठाण येथील मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून कर्मचारी व स्वच्छताकर्मी यांच्या सहयोगाने पार पडली.
घणसोली विभागात सेक्टर 1 येथील दर्गा ते पामबीच रोडपर्यंत मुख्य रस्त्याची सखोल स्वच्छता सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी संजय तायडे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी सतीश सनदी व स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांच्या नियंत्रणाखाली विभागीय अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी यांच्या वतीने करण्यात आली.
अशाच प्रकारे दिघा विभागातही एच विभाग दिघा कार्यालय परिसराची सखोल स्वच्छता सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे व स्वच्छता अधिकारी प्रवीण थोरात यांच्या नियंत्रणाखाली विभागातील स्वच्छताकर्मी व कर्मचारी यांच्या सहयोगाने करण्यात आली. इतर विभाग कार्यालय क्षेत्रातही सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. काही मोहीमांमध्ये नागरिकांनीही स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला. यापुढील काळात 13 जानेवारीपर्यंत नियोजन केल्यानुसार वातावरणातील धूळीचे प्रमाण कमी करुन हवेची गुणवत्ता वाढविणा-या सखोल स्वच्छता मोहीमा ठिकठिकाणी राबविण्यात येणार आहेत.
०००००
