-प्रविण दरेकरांचे आश्वासन
राजेंद्र साळसकर
सांगली : पत्रकार एखाद्या नेत्याची दिशा बदलू शकतात तशीच दशाही बदलू शकतात, ही ताकद पत्रकारांच्या लेखणीत असते. पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांनी अनेक इतिहास उभे केलेत. अनेक विषय चव्हाट्यावर मांडून ते मार्गी लावण्याचे काम याच मातीतील पत्रकारांनी केले आहेत. पत्रकारांना भेडसावणाऱ्या टोलमाफीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांशी बोलून तालुका व जिल्ह्याच्या पत्रकारांना सवलत कशी मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन, असे आश्वासन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले.
सांगलीतील ऐतवडे खुर्द येथील वारणा महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागातर्फे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘पत्रकार सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दरेकर बोलत होते. याप्रसंगी वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, भाजपा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत, स्थानिक आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार भगवान साळुंखे, वनश्री दूध संघाचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांसह शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना संबोधित करताना दरेकर म्हणाले कि, आज मी ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहे तो कार्यक्रम पत्रकारांचा आहे. जी पत्रकारिता चळवळ उभी केली गेली त्या चळवळीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे. दरेकर पुढे म्हणाले कि, आज पत्रकारांचा सन्मान होतोय. मीही एक साप्ताहिक चालवतो. त्यामुळे छोट्या पत्रकारांच्या व्यथा, अडचणी काय असतात याची नीट माहिती व आकलन मला आहे. ग्रामीण, तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतेय. पत्रकारांनी जो टोलमाफीचा प्रश्न सांगितला आहे त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन व तालुका, जिल्ह्याच्या पत्रकारांना सवलत कशी मिळेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दही दरेकरांनी यावेळी पत्रकारांना दिला.
विरोधी पक्षाचे नेते असेल तरी विकासासाठी सहकार्य करण्याची गरज
या प्रसंगी बोलताना दरेकर म्हणाले की, वारणा शिक्षण संस्थेचे डॉ.प्रतापराव पाटील यांचे सहकारातील योगदान आणि निष्ठा पाहून माझ्यासारखा कार्यकर्ताही प्रभावित झाला. डॉ.प्रतापराव विरोधी गटाचे असतानाही आम्ही त्यांना मदत केली. कारण, ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आणि कर्तृत्व आहे त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे हा विचार आम्ही केला व ऐतवड्याचा सुपुत्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाला, सहकाराचे नेतृत्व करायला लागला. ही शिकवण आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी दिलीय. विरोधी पक्षाची लोकं असली तरी विकासासाठी काम करण्याची गरज आहे. निवडणुका, पक्ष, विरोध निवडणुकीपुरता असतो. परंतु सर्वांचा अंतिम उद्देश समाजाचा विकास हाच असतो. तोच विचार घेऊन प्रतापराव पाटील यांच्याशी जवळीक वाढल्याचे दरेकर म्हणाले.
सहकारात नावीन्यपूर्ण प्रयोगाची गरज – दरेकरांचे प्रतिपादन
याच कार्यक्रमात बोलताना दरेकर यांनी सहकारात नावीन्यपूर्ण प्रयोग करत चांगल्या कल्पना घेऊन आम्ही काम करतोय. मुंबईत स्वयंपुनर्विकास योजना मुंबई बँक मार्फत सुरु केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहितीही दिली. मुंबई बँकेच्या सहकार्यातून स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून विलेपार्ले येथे उभ्या राहिलेल्या नंददीप सोसायटीचे कालच उदघाटन केले असून येथील रहिवासी ३४० स्क्वे. फुटाच्या घरातून १४०० स्क्वे. फुटाच्या घरात राहायला गेली असून अशा अनेक इमारती स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून उभ्या राहिल्या आहेत. सहकारी चळवळ वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण अशा कल्पना घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
