ठाणे : सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार, १३ जानेवारीला आई गांवदेवी (चिखलादेवी) चा यात्रा महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  ते  पुढे म्हणाले की, यंदा पालखी सोहळयाचे १९वे वर्ष आहे. आई गांवदेवी (चिखलादेवी) जत्रोत्सवाने महोत्सवी शतक पार केले आहे. दरवर्षीप्रमाणे आकर्षण म्हणून कोपरी परिसरातील हजारो महिला मोरपीशी रंगाची साडी नेसून व पुरूष मंडळी झव्वा परिधान करून पालखी सोहळा व जत्रोत्सवात सहभागी होणार आहेत. भजन, ब्रास बैंड पथक, बेंजो बैंड पथक तसेच कोळी नृत्य या पालखी सोहळयात मुख्य आकर्षण असणार आहे. यावर्षी ब्रास बैंड पथकातील सदस्य टी शर्ट व पारंपारिक कोळी टोपी या वेषभुषेत दिसणार आहेत. कोपरी गावात पालखीच्या वेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी व फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच गुलाल उधळत स्वागत केले जाते. या पालखी सोहळयात लहान व वयोवृद्ध कोपरीकर सामिल होत असतात. दुस-या दिवशी १३ जानेवारीला पहाटे ३.०० वाजता मान्यवर अध्यक्ष दिलीप (दादा) पाटील यांच्या हस्ते देवीचा अभिषेक होणार आहे. अभिषेक झाल्यानंतर देवीची आरती होणार व त्यानंतर दिवसभर मंदिर तसेच गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला राहणार आहे. तब्बल लाखोंच्या संख्येने भाविक आई गांवदेवीचे दर्शन घेतात. त्यात राजकारणी तसेच चित्रपट तारकांची मांदियाळी असते मंदिराच्या सभोवतालचा परिसर विद्युत रोषणाईने झळाळून निघतो.
या महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, विक्रोळीचे खासदार संजय पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *