मुंबई : सांगलीत विशाल पाटीलांनी अपक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या चंद्रहार पाटील या उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही या जागेसाठी काँग्रेस अजून आशावादी आहे.  सांगलीत शिवसेनेच्या उमेदवाराचा कुठेही बेस नाही, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी आता तरी याची जाणीव करून घ्यावी. परिणामी, शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्यास आमचा एबी फॉर्म तयार असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्यानंतर कार्यकर्त्यांचाच नाही तर माझाही हिरमोड झाल्याचेही पटोले म्हणाले.

दरम्यान, भंडारा-गोंदिया मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रफुल्ल पटेल जर जोर लावत असेल तरी ते आता लीडर राहिले नाही, तर ते डीलर झाले असल्याची बोचरी टीकाही पटोले यांनी केलीय.प्रकाश आंबेडकर आघाडीची चर्चा करताना पाठीमागे काय खेळ करतात, हे आता सर्वांना कळले आहे. त्यामुळे यावर आताच काही बोलण्याऐवजी याचे उत्तर मी  21 एप्रिलला अकोल्यात देईन, असेही नाना पटोले म्हणाले. मुख्यमंत्री आणि महायुतीचे हिंदुत्व हे नकली असून आता त्यांनी कितीही देवघरात जाऊन पूजा केली तरी काही फरक पडणार नाही, अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जर ठाकरे गटाने आपला उमेदवार कायम ठेवला तर विशाल पाटलांची समजूत काढू असेही नाना पटोले म्हणाले. सांगलीची जागा वाटाघाटीत सुटली आहे. आम्हाला हे माहित आहे की सांगलीत शिवसेनेच्या उमेदवाराचा मुळात कुठेही बेस नाही. तरीसुद्धा आम्हाला महाविकास आघाडी म्हणून त्याच्यासाठी काम करावे लागणार आहे.

परिणामी, काल विश्वजीत कदम, विशाल सावंत आणि पृथ्वीराज पाटील तिघांना महाविकास आघाडी सोबत राहण्याची सूचना आम्ही केल्या आहेत. असे असले तरी सांगलीची जागा शिवसेनेला सुटल्यानंतर केवळ कार्यकर्त्यांचाच नाही तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझाही हिरमोड झाला असल्याची खंतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलतांना व्यक्त केली आहे. मात्र आम्ही महाविकस आघाडी मध्ये घटक पक्ष असल्याने आम्हाला आघाडी धर्म निभावावे लागते, असेही पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *