नवी मुंबई : नियमित स्वच्छता करण्यासोबतच ज्या रस्त्यांवर अधिक वर्दळ असते किंवा एखादा दुर्लक्षित परिसर असतो अशा ठिकाणांकडे विशेष लक्ष देत त्याठिकाणी डीप क्लिनींग करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 डिसेंबरपासून दररोज सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत आहेत.
या अंतर्गत रहदारीचे मुख्य रस्ते, त्यांच्या शेजारील पदपथ व त्यांच्यामधील दुभाजक यांच्या कडेला साचलेली माती, झाडे – झुडपे काढण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण कमी झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. एकाचवेळी सर्व विभागांत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात असल्याने सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी रस्त्यांवर येणा-या नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
विभागनिहाय तयार केलेल्या वेळापत्रकानुसार या सखोल स्वच्छता मोहीमा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त संतोष वारुळे तसेच परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून संबंधित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचारीवृंद व स्वच्छताकर्मी यांच्या सहयोगाने राबविण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *