दिल्ली येथे पार पडणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा स्वागताध्यक्ष म्हणून मराठी साहित्यकांशी आज संवाद साधला.

गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझे दौरे, भाषणं सुरु होते. त्यातील सातत्यपूर्ण संबोधनामुळे माझा घसा बसला आहे आणि त्याचा थोडा बहुत दुष्परिणाम आजच्या संबोधनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी मगापासून विचार करतोय मध्यंतरीच मला संजय नहार यांनी सांगितलं की आपल्याला साहित्य संमेलनात उपस्थित राहायचंय. मी आनंदाने हो म्हटलं आणि माझी अपेक्षा होती, इथे आल्यानंतर नवीन पुस्तक, नवीन ग्रंथ बघायला मिळतील. नव्या साहित्याबद्दल माहिती घेता येईल. पण त्याला एक स्वागताचं- सत्काराचं स्वरूप आलंय त्याची खरंच आवश्यकता नव्हती. यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. त्यानंतर बऱ्याच वर्षाचं अंतर पडलं. त्यानंतर सरहदच्या पुढाकाराने आता दिल्लीमध्ये होतं आहे.

मी गेले काही वर्ष दिल्लीत राहतोय आणि त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक दिल्लीत आल्यानंतर अनेकांना भेटत असतात. त्याप्रमाणे कटाक्षाने मलाही भेटत असतात आणि त्याच वेळेला सरहदच्या सांगण्यात आलं संमेलन दिल्लीत घ्यायचे आहे. आणि जेव्हा सांगितलं अनेक लोक येतील तेव्हा मला आनंद झाला. कारण हे मराठी बांधव देशाच्या राजधानी येत आहेत. आपल्या सगळ्यांना गावाकडं पै-पाहुणे आल्यानंतर केव्हाही आनंद होतो. सगेसोयरे आल्यानंतर समाधान मिळतं आणि त्याच भावनेतून मी हो म्हटलं. पण माझी अपेक्षा होती या संमेलनाच्या पाठीशी आपण उभे राहावं. पण त्याहीपेक्षा अधिक काही गोष्ट करावी ही अपेक्षा सरहदची होती. त्यांनी जिथे संमेलन घेतलंय ही एक ऐतिहासिक जागा आहे.

तुम्हाला माहित असेल त्याचं नाव तालकटोरा. तालकटोराची एक पार्श्वभूमी आहे. त्या भागात स्टेडियम आहे पण या भागामध्ये एक इतिहास आहे. सदाशिवराव भाऊ महाराष्ट्रातून निघाले दिल्लीपर्यंत पोहोचले आणि दिल्ली ताब्यात घेतली, काबीज केली. सदाशिवराव भाऊंच्या समवेत जे सगळे सहकारी होते ते दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी ठरवलं गंगा यमुनेत स्नान करण्यासाठी पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून दिल्ली सोडून पुढे जाण्याचा विचार सदाशिवराव भाऊंनी केला. त्या वेळेला सूरजमल जाट यांच्याकडे दिल्लीचा तख्त होतं आणि सुरजमल जाटांनी सदाशिवराव भाऊंना सांगितलं की, “तुम्ही दिल्ली सोडू नका. दिल्लीवरचा ताबा ठेवा. तुमचा ताबा देशावर राहील” पण गंगेचं स्नान आम्हाला अधिक महत्त्वाचं वाटलं त्यामुळे आणि दिल्लीसोडून आमची सेना उत्तरेकडे आणखी पुढे गेली आणि पानिपतला आपला पराभव झाला. मी अधनं-मधनं पानिपतला जात असतो. तिथे मराठी बांधव आहेत. सदाशिवराव पेशव्यांच्या सैन्यातील जी काही पळापळ झाली त्याच्यातून अजूनही काही लोक तिथे राहिलेत. त्यांना ‘रोड मराठा’ असं म्हटलं जातं आणि ती सगळी मंडळी तिथे वास्तव्य करतात. कोणाच्याही घरामध्ये गेलं जिजाऊ यांचा फोटो दिसतो, शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो, महाराष्ट्र आणि मराठी बद्दलची आस्था असते आणि एक अस्वस्थताही त्यांच्या मनात असते की आमच्या पूर्वजांनी दिल्लीचा तख्त त्यावेळेला सोडायला नको होतं आणि हा पानिपतचा इतिहास घडला नसता तर आनंद झाला असता अशी भूमिका ही रोड मराठ्यांचे घटक मांडत असतात. ठीक आहे आता आपलं संमेलन त्या तालकठोरामध्ये आहे आता सुरजमल जाट तर नाहीत आणि आपणही काही पुढे जाऊ इच्छित नाही पण कमीत कमी हे संमेलन ज्या पद्धतीने आपण आयोजित करू आणि साजरा करू ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठीचा सुगंध दरवळेल आणि त्या दृष्टीने आज तयारी चाललेली आहे त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे.

दिल्लीमध्ये असे कार्यक्रम ज्यावेळेस होतात त्यावेळेला शक्यतो आम्ही राजकीय मत मतांतर हे बाजूला ठेवत असतो… दिल्लीत देशाच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर लोक येतात आणि साहजिकच त्यांची इच्छा असते की देशाच्या राजधानीमध्ये आपल्या लोकांना भेटता येतं आणि त्या भेटण्यामध्ये अतिशय समाधान नेहमीच व्यक्त करत असतात. आता हे संमेलन दिल्लीत होणार आहे याची चर्चा दिल्लीत सगळीकडे आहे. वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आहेत. दिल्लीमध्ये पत्रकार हे फक्त महाराष्ट्रपुरती सीमित नसतात ते सगळ्या देशाच्या प्रांताच्या प्रतिनिधी असतात आणि ते या-ना-त्यानिमित्ताने बातमीच्या दृष्टीने काही मिळेल ह्या हेतूने आम्हाला लोकांच्या पाठीमागे असतात. त्यातील बातम्यांच्या चर्चा संपल्यानंतर, प्रश्न संपल्यानंतर हल्ली मी बघतोय त्यांची चर्चा एकंच असते की मराठी साहित्य संमेलन. मला आनंद आहे की ज्या पद्धतीने दिल्लीच्या आणि उत्तरेकडच्या अनेक घटकांमध्ये एक औत्सुक्य आहे. त्यांच्या पाठिंबावर हे एक आगळं वेगळं संमेलन होईल याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. अलीकडे पुण्यामध्ये एक मोठं ग्रंथ प्रदर्शन झालं, त्याबद्दलची चर्चा मोठी आहे आणि गेले काही दिवस प्रचंड संख्येने मराठी जनांनी त्यात लक्ष दिल, इंटरेस्ट घेतला याचा आनंद आपल्या सर्वांना बघायला मिळाला.

काही गोष्टींची कमतरता असते पण त्याचा काही फारसा विचार करायचा नसतो. अनेक वेळेला अनेक संकट अनेक प्रश्न समाजकारणात राजकारणात मी बघितलेली आहेत, सत्तेत असतानाही बघितलेली आहेत. मला आठवतंय महाराष्ट्रमध्येच नाही तर देशामध्ये बाबरी मस्जिद आणि राममंदिर यातून एक संघर्ष झाला आणि त्या संघर्षातून मुंबईत आग लागली. मुंबईमध्ये अनेक घर पेटवली गेली. काही कुटुंबांची हानी झाली. मी केंद्र सरकारमध्ये होतो नरसिंह राव त्यावेळी प्रधानमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्र सावरायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्रात गेलं पाहिजे. मी आलो आणि ज्या दिवशी उतरलो त्या संध्याकाळपासून लक्ष घातलं आणि थोड्या काळामध्ये मुंबई शांत झाली, महाराष्ट्र शांत झाला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण वेगवेगळ्या जिल्ह्यातील मुंबईकर यांना एकत्र करायचा काम केलं. आज ऐक्याची गरज आहे हे त्यांना ठसवलं त्याचा परिणाम ती आग थांबली.

असंच एकदा दुसरं संकट माझ्या व्यक्तिगत जीवनात आलं आणि ते म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला द्यावं यासंबंधीचा प्रस्ताव होता. तो मी स्वीकारला आणि अतिशय समाधानाने घरी गेलो. घरी गेल्यानंतर रात्री जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांचे फोन यायला लागले. “मराठवाड्यात आग लागलेली आहे. दलितांची घर जाळली गेलेली आहेत अनेकांच्या हानी झाली.” अतिशय अस्वस्थ चित्र होतं. दुसऱ्या दिवशी मी आणि एसएम जोशी आम्ही दोघेही औरंगाबादला गेलो. आम्हा दोघांवरही चपलांचा वर्षाव झाला पण ठीक आहे तरी आम्ही त्यांच्याशी सुसंवाद ठेवायचा प्रयत्न केला. शेवटी आम्ही या निष्कर्षाशी आलो कि हा जो निर्णय आहे नामांतराचा तो स्थगित ठेवायची गरज आहे. अतिशय वेदना झाल्या मला की या देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव एखाद्या विद्यापीठाला दिलं तर ते सहन होत नाही ही स्थिती महाराष्ट्राची अत्यंत अशोभनीय आहे. पण नाईलाजाने शांततेसाठी आणि दलितांची घर वाचवण्यासाठी त्या निर्णयाला मला स्थगिती द्यावी लागली. त्यानंतर एक दोन तीन वर्षांनी पुन्हा एकदा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती म्हणजे हे चित्र बदलायचं कसा बदलता येईल आणि एक काम मी केलं मराठवाड्याच्या जवळपास ७०% पेक्षा जास्त कॉलेजेस मध्ये व्यक्तिशः गेलो. मुलांशी सुसंवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व त्यांना सांगितलं आणि त्या विषयात एक सामंजस्याने मार्ग काढला. नामांतराच्याऐवजी नामविस्तार हे सूत्र तरुणांच्या डोक्यात घातलं आणि तो भाग सबंध शांत झाला.

तिसरा एक प्रसंग असाच आयुष्यामध्ये बघायला मिळाला की मला आठवतंय त्यावेळेला गणपती विसर्जनाचा दिवस होता. साधारणतः गणपती विसर्जनाच्या दिवशी गृहखात्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याला शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत झोप येत नाही. पुणेकरांची गणपती विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत सुरू असते. त्या दिवशी असंच माझं लक्ष होतं रात्री तीन वाजेपर्यंत गणपती ठीक-ठिकाणी विसर्जित होत आहेत आणि परभणीत दोन मंडळांमध्ये मिरवणुकी पुढे नेण्यावरून वाद झाले पण शेवटी तो मिटला आणि शेवटच्या गणपतीचं विसर्जन झालं मी झोपायला गेलो आणि अर्ध्या तासात माझ्या घरच्या काचा आणि दरवाजे हलले. माझ्या लक्षात आलं भूकंप किंवा तत्सम काहीतरी घडलंय. मी लगेच कोयनेला फोन केला. कारण भूकंप म्हटलं की आम्हाला लोकांच्या डोक्यात त्याकाळी कोयना असे. कोयनेला विचारलं तर तिथल्या अधिकाऱ्याने सांगितलं भूकंपाचा केद्रबिंदू तिथे नाही तर लातूरला आहे. मग सकाळी साडेसातला तातडीने मी किल्लारीला पोहोचलो आणि अक्षरशः घर पडलेली होती, माणसांची प्रेतं पडलेली होती आणि लोक व्हिवळत आहेत, रडत आहेत. अतिशय विदारक चित्र त्या ७०-८० गावांमध्ये होतं. एक प्रचंड संकट महाराष्ट्रावर आलेलं होतं. मी मुंबईमध्ये आल्यावर महाराष्ट्राच्या जनतेला अपील केल्यानंतर लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला कि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी, शेतकरी असे सगळे पुढे आले आणि जे काही पुनर्वसन करायचं होतं ते करण्यासाठी मराठी ऐक्य कसं असतं याचं एक आदर्श चित्र पाहायला मिळालं.

एक शेवटचं संकट माझ्यावरती आलेलं होतं ते म्हणजे दंगलीनंतरची मुंबईची. तेव्हा नरसिंह राव पंतप्रधान होते, मुंबईचं जनजीवन पूर्वपदावर आम्ही आणली पण मुंबईचं स्टॉक एक्सचेंज तातडीने कार्यान्वित करणं गरजेचं होतं. नाहीतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आम्ही ४८ तासांमध्ये स्टॉक एक्सचेंज जाग्यावर आणलं. शाळा कॉलेजेस सुरू झाले आणि जगातले पत्रकार मुंबई बघायला आले आणि त्यांनी पाहिलं की मुंबईत नॉर्मलसी आहे हे उदाहरण एवढ्यासाठीच सांगितली कारण संकट येतात पण समाजमन जागृत असलं लोकांच्या मध्ये आत्मविश्वास वाढवला तर या देशात या राज्यात अशा सगळ्या संकटाच्या काळामध्ये आपल्याला जबाबदारी पार पाडण्यासाठी लोक सहकार्य आणि साथ देतात, हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे आणि तेच वैशिष्ट्य आपण जतन केलं पाहिजे.

गेले काही दिवस महाराष्ट्रात अस्वस्थ चित्र दिसतंय. माझे दिवसाचे ६-७ तास बीड कसं नॉर्मल करता येईल? परभणीचा विषय कसा सोडवता येईल? आणखीन कुठे काय करता येईल याबद्दल संवाद साधण्याबद्दल सुरु आहे. जिवाभावाने एकत्र राहणारी माणसं आज एकमेकांच्या शत्रुप्रमाणे वागत आहेत. काही गावांमध्ये एवढे दहशतीचं, भीतीचं वातावरण आहे. आजच मी इथे येण्याआधी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चाही झाली. राजकारणात काही मतभेद असतील नसतील पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही. काही झालं तरी ऐक्य करायचंच लोकांच्या मनातला विद्वेष जाईल कसा याची काळजी घ्यायची आणि ते काम करून एकटा-दुकटा करू शकत नाहीत. मुख्यमंत्री एकटे करू शकत नाही. सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले तुमच्यासारखे जाणकार या प्रश्नावर एका विचाराने उभे राहतील आणि आपला विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची काळजी घेतील त्यावेळेस मला खात्री आहे महाराष्ट्र हा शांत होईल.

आज महाराष्ट्र पूर्वस्थितीवर आणायचं अशी एक आव्हानाची स्थिती आपल्या सगळ्यासमोर आहे आणि ह्या कामांमध्ये साहित्यिकांची लेखणी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांची साथ संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. हे संमेलन यशस्वी होईल याची खात्री सगळ्यांनाच आहे जे-जे काही सहाय्य-सहकार्य त्यांना हवंय ते देण्यासाठी आज अनेकांच्या हात पुढे येतात याचा आनंद आहे. त्यात दिल्लीची निवड केली देशाच्या राजधानीची निवड केली आणि तिथे मराठीचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करण्याचा पुढाकार सरहदने घेतला त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *