सुनील प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई : लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुका होतील. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर कोकणी मालवणी माणूसच भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, विधानसभेतील शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी काल रात्री विश्वास व्यक्त केला तर दादरमध्ये सगळ्या जत्रा होतात पण मालवणी जत्रोत्सव होत नाही, अशी खंत व्यक्त करुन माहीमचे आमदार, विभागप्रमुख महेश सावंत यांनी दादरमध्ये मालवणी जत्रोत्सव भरविण्याचे सूतोवाच केले. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ आयोजित आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ तसेच मागाठाणे मित्र मंडळाच्या सहकार्याने मालवणी महोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सांगता काल रात्री शिवसेना नेते प्रतोद सुनील प्रभू आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी या दोघांनी आयोजकांचे कौतुक करतांना कोकणी मालवणी चाकरमान्यांनी ओसंडून वाहणारे मैदान हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. कोकणी माणूस आणि शिवसेना वेगळी करताच येणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने कोकणी मालवणी माणसाने पुढे नेण्याचे काम केले आहे. या मालवणी महोत्सवामुळेच कोकणी माणसाला शिवसेनेने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असेही सुनील प्रभू यांनी सांगितले. उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांच्या सह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते मालवणी महोत्सव आणि देव गिरोबा मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक १४, १२ चे सर्व पदाधिकारी, मागाठाणे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी हा महोत्सव यशस्वी केला. प्रभू आणि सावंत या आमदारांनी सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांना शुभेच्छा दिल्या.